कोरोना आणि ऑनलाईन शिक्षण.

कोरोना आणि ऑनलाईन शिक्षण | corona and online shikshan          

        कोरोना ह्या अदृश्य विषाणूने भारतात प्रवेश केला आणि भारताची अर्थव्यवस्था कोलमडण्यास सुरुवात झाली. याचा भारताच्या शैक्षणिक क्षेत्रावर खूप दीर्घकाळीन होणारा परिणाम आता 2 वर्षानंतर आपल्यासमोर येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील शिक्षण व्यवस्था बंद पडली कारण पारंपरिक शिक्षण व्यवस्थेपासून ऑनलाईन शिक्षणाकडे बदलण्यासाठी अपुरा असलेली व्यवस्था. भारतातील मुलांचे शिक्षण देखील बंद झाले. सरकारने शिक्षणात व्यत्यय येवू नये म्हणून सर्व मुलांना काही प्रमाणात सूट दिली आणि परीक्षेत सर्वांना उत्तीर्ण केलं, तसेच ऑनलाईन शिक्षण व्यवस्था अमलात आणण्याचा प्रयत्न नक्कीच केला पण त्यामुळे मुलांमध्ये शहरी आणि ग्रामीण शिक्षणाची दरी वाढतच गेली कारण इंटरनेट ची उपलब्धता हा शिक्षण सुरळीत राहण्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा होता. तसेच मुलांची अभ्यास करण्याची सवय मोडून गेली व ऑनलाईन शिक्षणामुळे मुले जास्त वेळ मोबाईल फोनचा वापर करू लागले आणि त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर झालेला आपल्याला प्रकर्षाने जाणवतो. त्यांच्यामध्ये दरम्यानच्या काळात आलेला चिडचिडेपणा, आक्रमकता ही आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी खूप गंभीर बाब आहे कारण ह्या सवयींचा त्यांच्या पुढील आयुष्यावर नक्कीच परिणाम होणार आहे.

कोरोना आणि ऑनलाईन शिक्षण

        लहान मुलांना तासनतास त्या मोबाईल स्क्रीन समोर बसावे लागले त्यामुळे शाळेत प्रत्यक्ष मिळणारे शिक्षण,अनुभव, समवयीन विद्यार्थ्यांची होणारी ओळख या सगळ्याला त्यांना मुकावे लागले. ऑनलाईन शिक्षण यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकास हा झालाच नाही. कोरोनामुळे मुलांचे आयुष्य बदलले, तसेच त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरणही पसरले, त्यामुळे सर्व स्तरावरील मुलांचा आतमविश्वास कमी झाला. जर भारताला संपूर्ण जगाचे नेतृत्व करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या देशातील युवा पिढीला उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे ज्यामध्ये ऑनलाईन माध्यमांद्वारे उदभवणाऱ्या क्षेत्रीय अडथळ्यांवर तोडगा काढून, समान दर्जाचे शिक्षण कशाप्रकारे उपलब्ध होईल यावर लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकांनाही कोरोना संपण्याची वाट न बघता ऑनलाईनच्या प्रणालीसोबत जुळवून घ्यावे लागले.

          दुसऱ्या दृष्टिकोनातून बघता कोरोना महामारीने  शिक्षण क्षेत्राला एक नवी संधी उपलब्ध करून दिली. ज्याद्वारे डिजिटल शिक्षणाचा रेंगाळत पडलेला निर्णय सरकारला परिस्थितीमुळे लवकर घ्यावा लागला आणि आपण कधी विचार केला नसावा इतक्या कमी वेळात आपली व्यवस्था ऑनलाईन क्षेत्रात स्वतःला जुळवून घेण्यासाठी तयार झाली. अशाप्रकारे ह्या संकटाने आपल्यासमोर अनेक आव्हानेही उभी केली पण त्यांच्यासमोर उभे राहून आपण नवीन मार्गही शोधले आणि शिक्षण क्षेत्रातल्या नवीन क्रांतीला भारतात प्रगतीपथावर नेण्यासाठी एक नवीन मार्गही तयार केला.

                                                – ऋषिकेश उगले.

                                                – सौरभ बिनवडे.

Read More- व्हेल माश्याच्या उल्टीची किंमत तब्बल 1 कोटी रुपये ? Whale vomit Price.

Read More- भारताच्या NDRF दलाला “संकटमोचक”का म्हटले जाते ?


Leave a Comment