भारताच्या कोणत्या भागात ‘Cancer Train’ चालवली जाते?

       भारतीय रेल्वेचा देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विस्तृत क्षेत्रांच्या विकासात मोलाचा वाटा राहिलेला आहे. जगातील चौथ्या नंबरची सर्वात मोठी रेल्वे सेवा भारतात उपलब्ध आहे. देशाच्या विविध भागात विविध नावांनी ओळखली जाणारी रेल्वे भारताच्या पंजाब ते राजस्थान भागात कॅन्सर ट्रेन म्हणून ओळखली जाते. आजच्या ह्या लेखातून आपण ‘कॅन्सर ट्रेन’ बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.



भारतामधील पंजाब (भटिंडा) आणि राजस्थान (बिकानेर) या दोन राज्यांदरम्यान Cancer train चालवली जाते. या रेल्वेला जे नाव देण्यात आले त्याचे कारण असे की, 1960च्या दशकात भारतामध्ये हरितक्रांतीने कृषी क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडवून आणले. ज्यामुळे पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या भागांमध्ये सुधारित गहू आणि तांदळाचे बियाणे वापरले गेले तसेच त्यासाठी लागणारे रासायनिक खते यांचा भडीमार पिकांवर करण्यात आला. त्यामुळे या भागांमधील पाण्यामध्ये आणि वातावरणात रासायनिक खतांचा जास्त वापर तेथील लोकांना कॅन्सरची बाधा करून गेला. रासायनिक खतांचे रिकामे डबे हे खाण्याच्या भांड्यांमध्ये काही भागात वापरण्यात आले त्याचा दुष्परिणाम त्यांना नंतरच्या काळात भोगावा लागला.

          या रेल्वे मधील 60 टक्के प्रवासी हे कॅन्सरग्रस्त असतात. पंजाब मधील आरोग्य व्यवस्था त्यांना सोयीस्कर न वाटल्याने ते बिकानेर येथील ‘आचार्य तुलसी रिजनल कॅन्सर ट्रीटमेंट रिसर्च सेंटर‘ येथे इलाज करण्यासाठी जात असतात. या रुग्णांमधून बरेच रुग्ण पंजाबमधील मालवा भागातून येतात आणि या भागाला कापूस उत्पादनाचा पट्टा ही मानले जाते. रासायनिक खतांचा जास्त प्रमाणात केलेला भडिमार येथील लोकांसाठी कॅन्सर रोगाचं कारण बनल्याचे दिसून येते. 2011 च्या आकडेवारीनुसार, पंजाब मधील शेतकरी 923 ग्रॅम प्रति हेक्टर या प्रमाणात रसायनांचा वापर करतात पण भारताची रासायनिक खते वापरण्याची सरासरी 570 ग्रॅम प्रति हेक्टर आहे यावरून आपण त्या भागातील रसायनांचा वापर समजू शकतो.

        पंजाब सरकारच्या राज्यातील आकडेवारीनुसार, 18 व्यक्ती प्रतिदिन या संख्येने राज्यातील नागरिकांना कॅन्सरची बाधा होते. पंजाबमध्ये प्रत्येकी 1 लाख  मधील 90 व्यक्ती कॅन्सरने प्रभावित आहेत तर हीच संख्या भारताच्या सरासरीमध्ये 80 व्यक्ती प्रति 1 लाख आहे. तसेच पंजाब राज्यातील एकूण रासायनिक खतांच्या वापरापैकी 75 टक्के वापर मालवा भागात होतो त्यामुळे या भागाला ‘कॅन्सर बाधित क्षेत्र‘ म्हणून ओळखले जाते.

                                                       -ऋषिकेश उगले.
                                                       -सौरभ बिनवडे.

Leave a Comment