आपल्या वाहनात इथेनॉल व शेतकऱ्यांना होणार फायदा

     जागतिक तापमानवाढीचे परिणाम कमी करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून भारत सरकारने कृषि उत्पादनातून इथेनॉल निर्मितीसाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या एकूण इंधन गरजेसाठी आपण 85 टक्के तेल आयात करतो ज्यामध्ये आपले हजारो कोटी रूपये बाहेरील देशांत जातात. इतर देशांवरील आपले अवलंबित्व कमी करून जैव-इंधन निर्मितीद्वारे आत्मनिर्भर बनण्यासाठी इथेनॉल मिश्रणाचे ध्येय खूप महत्वाचे आहे.

आपल्या वाहनात इथेनॉल व शेतकऱ्यांना होणार फायदा



 इथेनॉल म्हणजे काय ?

      इथेनॉल हे एक जैव इंधन आहे जे ऊस, मका, तांदळाचा भुसा यांवर प्रक्रिया करून बनविले जाते. याचे वैशिष्ट असे की, हे इंधन पूर्णतः जळते व कार्बन मोनोक्साईड सारख्या हवेला प्रदूषित करणाऱ्या घटकांची मात्रा दुचाकी वाहनांमध्ये 50 टक्के तर चार चाकी वाहनांत 30 टक्क्यांनी कमी करते. या इंधनाचा नायट्रस ऑक्साईड ची मात्रा कमी करण्यासाठी फारसा उपयोग होत नाही कारण ते वाहनाच्या इंजिनावर अवलंबून असते.

        भारताने E10 म्हणजेच पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे ध्येय निर्धारित वेळेच्या आत पार केले आहे व आता E20 म्हणजेच 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचा टप्पा 2025 पर्यंत पार पाडण्यासाठी कटिबध्द आहे. नीती आयोगाच्या एका अहवालानुसार, भारतामधील एकूण इंधन गरजेपैकी 98 टक्के गरज ही जीवाश्म इंधन व 2 टक्के जैव – इंधनाद्वारे भागवली जाते. 

इथेनॉल निर्मितीसाठी लागणारी व्यवस्था : 

      इथेनॉल निर्मितीसाठी आपण सध्या उसावर जास्त अवलंबून आहोत. ऊस हे जास्त पाण्याची गरज असणारे पीक आहे. जर इथेनॉल निर्मितीसाठी उसाव्यतिरिक्त कृषि मालाचे स्त्रोत आपण वापरले नाही तर कमी पाणी असणाऱ्या क्षेत्रात पाण्याचा प्रश्न अजून बिघडू शकतो, त्यामुळे इतर पिकांमधून इथेनॉल निर्मिती साठी संशोधनावर भर द्यायला हवा. ऊसापासून तयार केलेले  

1G इथेनॉल असते तर उसाव्यतिरिक्त तयार केले जाणारे 2G इथेनॉल संबोधले जाते. 

    सर्वात पहिले ज्या राज्यांमध्ये उसाचे भरघोस उत्पादन होते तेथे इथेनॉल निर्मितीसाठी यंत्रणा उभी करायला हवी व त्यानंतर ऊस उत्पादन नसणाऱ्या क्षेत्रात इथेनॉल वाहतुकीची साखळी मजबूत करण्यास प्राधान्य द्यायला हवे. सरकारद्वारे उचित आर्थिक व तांत्रिक सहाय्य उद्योगांना देणे अपेक्षित आहे. तसेच वाहन बनवणाऱ्या कंपन्यांना स्वतःच्या इंजिनमध्ये इथेनॉलशी सुसंगत असणारे तंत्रज्ञान विकसित करून या ध्येयाकडे वाटचालीसाठी पावले उचलणे अपेक्षित आहे.

बाहेरील देशांचा आढावा: 

      अमेरिका व ब्राझील मिळून जगातील 92 बिलियन लिटर्स इतकी इथेनॉल निर्मिती करतात जी जगाच्या एकूण उत्पादनापैकी 84 टक्के आहे. ब्राझीलमध्ये कायद्याअंतर्गत फ्लेक्स फ्युल असणारी वाहने 100 टक्के इथेनॉलवर चालतात. नवीन विक्री होणाऱ्या वाहणांपैकी एकूण 80 टक्के वाहने फ्लेक्स फ्यूल तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामुळे त्यांच्या देशातील एकूण इंधन वापरात 46 टक्के वाटा इथेनॉलचा आहे. भारतामधील इथेनॉलच्या किमती बाकी देशांपेक्षा जास्त असण्याचे कारण म्हणजे आपल्या सरकारद्वारे ऊस, गहू यांसारख्या पिकांवर निश्चित दर (FRP, MSP) ठरवले जातात. येणाऱ्या काळात सुधारित तंत्रज्ञानाद्वारे त्यांच्या किमती कमी होण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

कृषि उत्पादनानुसार इथेनॉलची किंमत :  

तांदळापासून बनविलेले – 56.87 रुपये

खराब झालेले धान्य – 51.55 रुपये 

ऊसापासून बनविलेले – 62.65 रुपये 

इथेनॉलवरील कर : 

      इथेनॉल हे GST अंतर्गत आणल्यामुळे त्यावर 2.28 ते 3.13 / लिटर इतका कर आकाराला जातो. त्यातुलनेत पेट्रोल ज्यावर केंद्र सरकार 32.98 रुपये / लिटर आकारते त्यापेक्षा इथेनॉल स्वस्त दरात मिळेल. येणाऱ्या काळात पेट्रोलची जागा इथेनॉलने घेतल्यास केंद्र सरकारला 10,950 हजार कोटींचा तोटा सहन करावा लागेल. 

निसर्गावरील परिणाम : 

    1 टन ऊस उत्पादनातून 100 किलो साखर व 70 लिटर इथेनॉल निर्मिती केली जाते. 1 किलो साखर बनवण्यासाठी 1600 ते 2000 लिटर पाण्याची आवश्यकता असते, त्यामुळे 1 लिटर इथेनॉल निर्मितीसाठी तब्बल 2860 लिटर पाण्याची गरज भासेल. भारतातील एकूण सिंचनाच्या पाणी वापरापैकी 70 टक्के पाणी ऊस व तांदूळ हे पिकेच वापरतात. 

इथेनॉल निर्मिती समोरील आव्हाने : 

   1. मुबलक प्रमाणात कच्चा माल उपलब्ध नसणे

   2. इथेनॉल निर्मितीसाठी यंत्रणा उभी करणे

   3. आंतर राज्य इथेनॉल वाहतूक व्यवस्था प्रस्थापित करणे

   4. अनपेक्षित नैसर्गिक संकटांचा प्रभाव

   5. इथेनॉल व कच्चा मालाची अस्थिर किंमत

    केंद्राच्या नियमानुसार, पिण्यास अयोग्य इथेनॉल हे केंद्र सरकारच्या अधिकारात येते व त्याची आंतरराज्य वाहतूक सुरळीत करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. आतापर्यंत फक्त 14 राज्यांनी या नियमाचा अवलंब केला आहे. तसेच, केंद्र सरकारद्वारे करातून सवलत देणे, पेट्रोलपेक्षा त्याची किंमत कमी ठेवणे , आर्थिक गुंतवणूकीसाठी मार्ग उपलब्ध करणे या उपाययोजना करायला हव्यात जेणेकरून या ध्येयाकडे सर्वसमावेशक वाटचाल करता येईल. त्याचप्रमाणे आपल्या देशातील शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून इथेनॉल मिश्रण योजना साबित होवू शकते.

Leave a Comment