किती दिवस घेवून फिरणार आपण विचारांमधील तराजू ?

       जन्मापासून ते मरणाच्या उंबरठ्यावर उभे असे पर्यंत तुलनेच्या जंजाळात स्वतःला अडकवून घेवून आपण कितीतरी चांगल्या क्षणांचा मनसोक्त आनंद घेण्यापासून मुकतो. आपल्या मुलाला मिळालेले गुण कमी की जास्त याची पोचपावती आपल्याला दुसऱ्यांच्या मुलांना किती गुण मिळाले त्यांच्याशी तुलना करून ठरवणे म्हणजे स्वतःच्या मुलाने केलेल्या मेहनतीवर हा एक अन्यायच ! 

     प्रत्येकवेळी कोणतीही घटना असो आपण नेहमी तुलनेचा तराजू घेवून तयारच असतो. भले आपल्याला गाडी घ्यायची असो वा राहायला घर, त्यांचे असे आहे व आपले असे म्हणजे आपण स्वतःसाठी विकत घेत असलेल्या वस्तू आपण दुसऱ्याच्या तुलनेत कश्या आहेत याचा कुठेतरी अंदाज बांधून घेत असतो. याचा असाही एक अर्थ लागतो की, स्वतःच्या जीवनासाठी वस्तू घेण्यात आपण स्वतःचे वैचारिक स्वातंत्र्य गहाण ठेवून दुसऱ्यांच्या अपेक्षांचे ओझे झेलत स्वतःचे निर्णय घेतो. पण किती दिवस चालणार ही विचारांची ओढाताण ? 

      खरी तुलना करायची तर ती स्वतःशीच ! तुम्ही आज, कालच्या दिवसापेक्षा कसे अधिक उभारी घेवू शकतात यावर आपण लक्ष केंद्रित करायला हवे. जेव्हा आपण कोणाशी तुलना करतो तेव्हा आपला उद्देश हा त्या व्यक्तीपेक्षा थोडे चांगले होवू यावर असतो पण स्पर्धा ही जेव्हा स्वतःशी असते तेव्हा आपल्या उभारीला कोणते बंधन नसते, कर्तृत्व व व्यक्तिमत्त्वाचा हात पकडुन आपण अतिउंच यशाची शिखरे पादाक्रांत करू शकतो.

    आपली दुसऱ्यांसोबत तुलना करणे म्हणजे आपल्या आतापर्यंतच्या जीवनातील व्यक्तींचा अपमान, शिक्षकांचा अपमान, आपल्याला वाढवणाऱ्या आई – वडिलांचा अपमान ! प्रत्येक व्यक्ती हा विशेष व वेगळा आहे. त्यांच्यातील सुप्त गुण , बलस्थानेही निराळीच. एकदा कधीतरी स्वतःला या तुलनेच्या जंजाळातून सोडवून तर पहा! तुम्हाला स्वतःमधील क्षमतेबाबत हळूहळू आत्मविश्वास निर्माण होईल, वैचारिक स्वातंत्र्याची खरी अनुभूती तुम्हाला या मानसिक अवस्थेत अनुभवयास मिळेल. 

       सगळ्यात शेवटी तुलना सोडल्यावर तुम्हाला जाणवेल असा अनुभव म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या सुखात मनापासून सहभागी व्हाल, दुसऱ्यांप्रती असणारी आपली इर्ष्येची भावना लोप पावेल व आपल्या सोबतच्या लोकांसोबत आपले नवीन नाते बहरून येईल ज्याची चाहूल तुम्हाला कालांतराने जाणवेल.

Read More – सिमकार्ड चा एक कोपरा कापलेला का असतो ?

Read More –  7/12 उतारा म्हणजे काय ?त्यामधील 7 आणि 12 याचा अर्थ काय.

1 thought on “किती दिवस घेवून फिरणार आपण विचारांमधील तराजू ?”

Leave a Comment