जगभरातील कोरोनाच्या अनुभवातून वैचारिक क्रांतीला सुरुवात होईल का?

कोरोना नावाच्या विषाणूने जगभरात माजवलेला हाहाकार आणि मानवाच्या हृदयात गच्च भरलेली धडकी, या विषाणूचा उपद्रव कळण्यास पुरेसा तपशील ठरतील.ज्या अदृश्य शत्रूने स्वपुरस्कृत बुद्धिमान संबोधणाऱ्या मानवाला पूर्णतः सुन्न केले आणि स्मशानाच्या उंबरठ्यावर उभे केले त्याचा येत्या काळात मानवाच्या विचारांना नवी दिशा देण्यात मोलाचा वाटा असेल हे आता लक्षात घ्यायला पाहिजे.‘कोविड १९’ कडे केवळ एक साथीचा रोग किवा संकट म्हणून न पाहताभविष्यातील बदलाची कल्पना आपल्याला वर्तमानात देणारी व्यवस्था म्हणून या साथीचा विचार केला पाहिजे. मुळात वस्तुस्थिती अशी आहे की,जेव्हा मानवाच्या नरड्यावर बसून शत्रू अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करेल, तेव्हा माणूस नुसता विचारच नाही तर सवयी आणि राहणीमान सुद्धा बदलेल.


सध्यापरिस्थितीवर नजर फिरवली तर आपल्याला कळेल कि,जगातल्या लखलखत्या शहरांत जेथे वावरतांना मानवाची मुंग्यांसमान अवस्था व्हायची, तेथे आज दुर्मिळ पशु-पक्ष्यांची वर्दळ वाढल्याची साक्ष अनेक समाजमाध्यमांनी त्यांच्या प्रक्षेपणातून रसिक-प्रेक्षकांच्या मनात पोहोचवली.या निसर्गाने मानवाला घरात सक्तीने डांबून जणू‘मानवसंग्रहालय’ बघण्यासाठी प्राणीमात्रांना मुभा दिली असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आली असावी.जो रोग फक्त मानवाला होतो आणि इतर निसर्गाच्या केसालाही धक्का लावत नाही याचा अर्थ असाही लावला जावू शकतो कि,कदाचित निसर्गाला मानवनिर्मित प्रदूषणाचा आणि ढासळलेल्या विचारांचा मळ झटकारून पुन्हा एकदा टवटवीत आणि प्रफुल्लीत होवून हे विश्व सर्वांच्या अस्तित्वासाठी आहे ही जाणीव त्याला करून द्याविशी वाटत असेल..

       येणाऱ्या काळात कोरोनाच्या विळख्यातून हा मोलाचा समज विचारांमध्ये रुजून जाऊ शकतो कि,आपल्या जीवनात अवलंब केलेल्या चांगल्या सवयीच आपले अस्तित्व टिकवू शकतात कारण, ह्या अतिशय भयावह परिस्थितीत माणसाला पैसाही वाचू शकला नाही.ज्या  अब्जाधीशांकडे बेसुमार मालमत्ता होती, त्यांनीसुद्धा शत्रूच्या पायात लोळण घातली.यावरुनच नजीकच्या काळात स्वतःला आर्थिकसोबतच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही सक्षम करण्याचा कल वाढू लागेल.तसेच लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच वेळ एवढया वर्षांनंतर परिवारातील सगळे सदस्य एकत्र जमले,जुन्या आठवणींना उजाळा मिळाला,अनेक गैरसमजांना बाजूला सारून,एकमेकांना मनोबल देतांना नात्यांची कोवळी पालवी मात्र बहरून आली आणि परिवाराच्या एकात्मतेच्या संकल्पनेला गालबोट लावणारा एकटेपणा मात्र बाजूला सारला गेला.या काळात स्त्रियांना घरकामात मदत करून तिच्या अथक परिश्रमाची संवेदनशीलता जवळून बघितल्यावर तिच्या ह्या अद्वितीय मायेने नक्कीच सर्वांच्या मनात तिच्या कामाच्याप्रती अभिमानाची भावना उजळून निघालेली असेल.त्यातच ज्या घरांमध्ये आजी-आजोबा असतील त्या घरात एकमेकांना या अघोषित युद्धजन्य परिस्थितीत धीर देतांना, एकत्रित कुटुंब पद्धतीची खरी संकल्पना लहानग्यांच्या आणि अर्थात मोठ्यांच्या मनात घर करून जाईल.

    तशी भारताची संस्कृती,तिच्या चालीरीती,तिचे संस्कार हे आपल्याला या
कोरोनाच्या परिस्थितीत कशाप्रकारे जीवनापयोगी ठरले हे समाजाला कळून
चुकले.आपल्या संस्कृतीमधील दोन हात जोडून ‘नमस्कार’ करण्याची पद्धत जी कोरोनाच्या उंबरठ्यावर स्वतःच्या जीवाला मृत्युशय्येवर जाण्यापासून
वाचवण्यासाठी प्रगत  देशांनीसुद्धा अवलंबिली  आणि भारताच्या अतुलनीय,समृद्ध आणि उदात्त संस्कृतीचा जयजयकार जगाच्या  दिशांना दुमदुमला.यातूनच नजीकच्या काळात “नमस्कार” हे सभ्य समाजाचे लक्षण मानले जाईल असे म्हटले तर वावग ठरणार नाही.त्याचसोबत सुरक्षित अंतर ठेवण्याची सवय जी कोरोना काळात जडलेली असेल ती कालांतराने स्त्रियांना गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळवण्यास फायदेशीर ठरेल.म्हणजे एकूणच समाजात स्त्री- सुरक्षेसाठी कोरोनाचा खूप मोठा वाटा राहू शकतो.
         त्याचबरोबर लॉकडाउनच्या काळात भारताच्या अनेक क्षेत्रात जसे
शैक्षणिक,आरोग्य,उद्योग,कायदा व सुव्यवस्था,आपत्ती व्यवस्थापन या सर्वांमध्ये ‘डिजीटल तंत्रज्ञान’ एका नव्या विचाराचा किरण घेवून उगवले.जेव्हा शालेय अभ्यासात विद्यार्थ्यांना व्यत्यय जाणवू लागला तेव्हा ऑनलाईन शिक्षणपद्धतीने एक नवा पर्याय शिक्षणक्षेत्रासाठी खुला केला ज्यात अनेक रोजगाराच्या संधीसुद्धा तयार झाल्या.आरोग्य क्षेत्रात जेव्हा रुग्णावर नजर ठेवणे,सुशिक्षित डॉक्टरांना
जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचवणे आव्हानात्मक वाटू लागले तेव्हा डिजीटल तंत्रज्ञानाने ‘आरोग्य सेतू’ ऐपच्या सहाय्याने हाही मार्ग सुकर केला.तसेच दरम्यानच्याकाळात सुप्रीम कोर्टाने ‘ई-कोर्टस’ ही संकल्पना अवलंबिली ज्यात कोरोनाचे प्रादुर्भाव न्याय व्यवस्थेला अडसर ठरू नये म्हणून प्रलंबित खटले निकाली काढण्यात आले.बहुतांश उद्योग समूहांनी तर ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना सुरु केली आणि ती पूर्ण विश्वात एक नाविन्यपूर्ण उद्योजकतेचा चेहरा म्हणून उदयास आली.म्हणजेच जेव्हा प्रतिकूल परिस्थित या ‘डिजीटल तंत्रज्ञानाने’ या सर्व क्षेत्रांचा मार्ग सुकर केल्यामुळे येणाऱ्या काळात याच्या अंमलबजावणीचा विचार मानवाच्या मनात नक्कीच जोर धरेल.
        दुसऱ्या दृष्टीकोनातून पाहता,या कोरोनाच्या लढाईत अनेक सामाजिक
संस्था,पोलिस कर्मचारी,आरोग्य कर्मचारी,सरकार, साफ-सफाई कामगार या
सर्वांच्या अतुलनीय आणि निस्वार्थ सेवेमुळे या रोगावर आपण शिताफीने नियंत्रण मिळवत आहे.आणि या सर्वांत एक सकारात्मक बाब म्हणजे ज्या पोलिस खात्याविषयी मधल्या काळात जनतेमधी थोडी नकारात्मकता साचली होती ती या उद्दात निस्वार्थी सेवेने लोप पावली आणि या सर्वांमध्ये जनतेने देवांस पाहिले.जेव्हा हे सर्व संकटाच्यावेळी देवदूतांच्या भूमिकेत उतरले व मृत्युच्या घेऱ्यातून काहींना बाहेर काढू शकले आणि याच दृष्टीकोनामुळे पुढील काळात जनता आणि जनतेचे सेवक यांमधले नाते दृढ होईल हा मला विश्वास आहे.
         कोरोनासारखाच लोकांच्या जीवावर बेतणारा अजून एक खूप वर्षांचा आजार म्हणजे उपासमार होय.जर आकडेवारीवर आपण एक नजर टाकली तर हे लक्षात येईल कि सुमारे २५ लाख भारतीय हे भुकेच्या कारणाने मरण पावतात, तर दिवसाला तब्बल ७००० भारतीय आपला जीव गमावून बसतात.पण तुमच आमच दुर्दैव कि, ही संख्या आपल्या समोरच आणली जात नाही आणि राजनीतिक हेतू साध्य करण्यासाठी निवडणुकांच्यावेळी आपली पोळी भाजण्यासाठी केल्या
जाणाऱ्या तुपासारखा हा मुद्दा वर्षानुवर्षे वापरला जातो.या उपासमारीने
आर्थिकदृष्ट्या कमकुवत माणसांच्या मांसाची जणू लोचकेच तोडले आहेत अशी जाणीव आपल्याला होवू शकते परंतु या दीर्घकालीन पिडेला मीडियातून एवढी वाचाच फुटत नाही याच कारण म्हणजे ही उपासमार श्रीमंतांचा जीव घेवू शकत नाही.पण कोरोनाच्या काळात जेव्हा मिडीया ने भुकेल्या मानवाच्या समस्येवर बोट ठेवले तेव्हा भरपूर सामाजिक संस्थांच्या सहकार्यचा पूरच वाहून आला आणि तात्पुरते गरजूंना मानसिक समाधान लाभले. ज्याप्रकारे या अघोषित युद्धात समाजमाध्यमांनी लोकांसमोर खऱ्या समाजाची बाजू प्रकाशझोतात आणून
वास्तवाची जाणीव करून दिली तशीच जर याआधी केली असती तर कोणतेही माय-बाप लेकरू या जगात भूक झोपले नसते. त्यावरून एक गोष्ट निश्चित वाटते कि,आता जर थोड्या प्रमाणात सुरुवात झाली आहे तर या उपसमारीविरूद्ध जनमाणसात आवाज नक्की उठेल.ज्या प्रकारे काही देशांत ‘ओपन फ्रीज’ ही संकल्पना उद्यास आली, ज्यात आपल्या घरचे अधिक अन्न ह्या फ्रीज मध्ये ठेवून गरजूंना उपलब्ध करून द्यायचे त्यावरुन आपण माणसाची बदलणारी विचारसरणी समजू शकतो.संत तुकारामांच्या मातीत आपण जन्मलो आणि त्यांच्या प्रख्यात अभंगातील
उक्ती,म्हणजे
           ‘जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले ll
            तोचि साधू ओळखावा l देव तेथेचि जाणावा ll
      अर्थात दुर्बलांच्या,निराधारांच्या,वंचितांच्या सेवेत आपण ईश्वरसेवा मानवी आणि माणसांत देव शोधावा हा ह्या पंक्तीचा अर्थ जरी आपण आपल्या विचारांत रुजवला तर ह्या विश्वात कुणीही मायलेक भुकेल झोपणार नाही याची शाश्वती मी देऊ शकतो आणि तुकारामांच्या ओळी सामाजहितात कामी आल्या याचाही मनाला सर्वोच्च आनंद मिळू शकतो.
       नुकत्याच मागील काही दिवसांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनने ‘डीजीटल चलन’आणण्याच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत.ह्याच दिशेने भारत आणि इतर देशांत ‘रोकडविरहीत अर्थव्यवस्था’ ही संकल्पना तग धरून बसली आहे.आणि येणाऱ्या काळात नक्कीच हा विचार क्रांती घडवून आणेल व जगाच्या मुद्रा- देवाणघेवाण कार्यपद्धतीत कायापालट घडवून आणेल.हे सर्व घडत असतांना ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना भारताने संस्कृतीशी नाळ अखंड ठेवत जपली.ज्या गरजू देशांना वेळेवर कोणत्याही विकसित देशांनी मदत केली नाही,त्यांच्यासाठी भारत धावून गेला आणि हीच बाब आपल्या संस्कृतीची मशाल बनून जगभरात ज्वलंत घुमत राहिली.भारताच्या वैश्विक बांधिलकीमुळे नजीकच्या काळात इतर देशांच्या विचारात एक चांगली वैश्विक प्रतिमा छापली जाईल आणि त्यामुळे
नक्कीच देशाच्या परदेशीय संबंधांना मजबुती प्राप्त होईल.
         कोरोनाच्या अनुभवातून मानवजातीला गेलेला एक विचार म्हणजे अकार्यक्षम आरोग्य-सुविधा.ज्या देशांनी सर्वोच्च गुणवत्तेच्या तंत्रज्ञानासाठी अवाजवी खर्च केला पण तरीही त्या जनतेला वाचवू शकल्या नाहीत याचाच अर्थ आपल्याला अजून आरोग्य-क्षेत्रात बराच पल्ला गाठायचा आहे.आयुर्वेदाकडे समाजाचा वाढता कल हा पुढील काळात विचारांच्या क्रांतीचा मार्ग ठरतांना दिसतोय.कारण लोक आता रासायनिक पेक्षा नैसर्गिक गोष्टींना जास्त महत्त्व द्यायला लागले.अनिश्चित रोगामुळे समाज आता अजून आरोग्यविषयक संवेदनशील होईल.प्राणायाम,सकाळचा व्यायाम यामध्ये वाढ होईल कारण हे जर का आपल्या जीवनासाठी पोषक वातावारण तयार करू शकतात तर नक्कीच येत्या काळात हा विचार माणसाला एक नवी दिशा आरोग्य क्षेत्रात दाखवेल. 
       त्याचप्रमाणे बहुतांश मंदिरांमधले देवी-देवता यांचे सकाळ-संध्याकाळचे पूजन जे ‘लाइव्ह’ दाखवले गेले,ती आता येणाऱ्या काळात देव-दर्शनाची नवी संकल्पना ठरू शकते.गर्दी टाळण्यासाठी आणि जवळून दर्शन घेण्यासाठी देखील बहुतेक जण येणाऱ्या काळात या मार्गाचा अवलंब नियमित करू शकतात.तसेच ‘ई-दानपेटी’ ही उदयास आली ज्यामध्ये घरबसल्या देव-चरणी पैशांची ओवाळणी देवू शकतो.एकूणच ज्या प्रमाणे डिजिटल ने बाकी क्षेत्रात नाविन्य आणले तसेच धार्मिक कार्यांत आपणास अनुभवयास मिळू शकते.
         आधीच्या काळी मानवाच्या गरजा खूप कमी होत्या आणि त्यामुळे निसर्गाला धोका कमी होता.पण जसजसे शोध लागत गेले,संसाधनांचा वापर वाढत गेला आणि निसर्गाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरू लागला.पण ह्या लॉकडाऊनने नकळत ही जाणीव मानवाला करून दिली की,कमीतकमी साधनांचा वापर करून तुम्ही आनंदाने जीवन जगू शकतात.जसे घरी राहून काम करणे,वाहनांचा कमी वापर,विनाकारण अवाजवी खर्च थांबवणे,इत्यादी.तशाचप्रकारे लॉकडाऊनने अनेक वर्षांपासून समाजात असंतोष पसरवणाऱ्या तळीरामांना मात्र एक मोलाचा संदेश दिला.प्रत्येक वेळेस त्यांची ही तक्रार असायची की,सवय आहे आणि ती सुटणार नाही.पण जेव्हा मानवाच्या छाताडावर बसून शत्रूने धडकी भरली आणि जीवावर रोग बेतण्याची जाणीव झाली तेव्हापासून अनेकांनी मद्याचा मागावा पण केला
नाही.यावरून समजते कि,जेव्हा लढाई अस्तित्वाची असेल तेव्हा सर्व गोष्टी बाजूला होतात आणि विचारांमध्ये क्रांती घडून येते.
         भारताच्या राष्ट्रापित्यांनी काही वर्षांपूर्वी दिलेला एक संदेश-‘गावाकडे
चला’,ह्याचा खरा अभिप्राय शहरवासियांना यादरम्यान जाणवला असेल.ज्या
पद्धतीने शहराकडे रोगाने आगेकूच केली,तो वेग ग्रामीण भागात मंदावला
गेला.याच कारण म्हणजे ग्रामीण भागात असलेली निसर्ग सह्वासातली अद्वितीय प्रतिकारशक्ती आणि एकत्रित कुटुंब व्यवस्था ज्यामुळे त्यांचे मनोधैर्य खंबीर
राहिले.ज्यावेळेस ह्या कोरोनाचा उद्रेक वणव्यासारखा फोफावू लागला तेव्हा
अचानक ग्रामीण भागात जाण्यासाठी लोकांची वर्दळ वाढू लागली.प्रसिद्ध ‘हिवरे बाजार’ ग्रामपंचायतीने तर एक अभूतपूर्ण निर्णय घेतला की,येथून पुढे दरवर्षी एक आठवडा संपूर्ण गाव लॉकडाऊनचा अवलंब करणार.यावरून नक्कीच जाणवते की,येणाऱ्या काळात वैचारिक क्रांतीची लाट जनमानसात उफाळून निघेल.तसेच मानवाला ह्या बाबेची चुणूक लागली आहे की,येत्या काळात असे अनेक विषाणू तयार होतील त्यामुळे गावांकडे प्रस्थान करण्याचा विचार नक्कीच ग्रामीण भरभराटीला पोषक बनू शकतो.
             अशाप्रकारे माणसाने अश्व-युगापासून ते आतापर्यंत खूप शिखरे पादाक्रांत केली.जेवढा तो चंद्रावर गेला,तेवढाच तो विचारांनीही खाली गेला.निसर्गाची अक्षरशः केलेली ही गळचेपी ही उलटून माणसाच्याच जीवावर बेतणार हे नक्कीच होत.स्वतःला सर्वश्रेष्ठ दाखवण्याच्या प्रयत्नात त्याने निसर्गाचे अनेक मानवनिर्मित शत्रू बनवले आणि आपल्या बलाढ्य बुद्धिमत्तेचा सांगावा तिन्ही लोकांत धाडू लागला पण ह्या निसर्गाने अहंकाराला लगाम लावण्यासाठी एकच अदृश शत्रू सोडला आणि मानवाच्या ढासळलेल्या विचारांना सणसणीत चपराक लगावली.ह्या युद्धातून घेतलेल्या अनुभवातून नक्कीच मानवाच्या कुविचारांची मृत्युच्या अग्निकांडात राख होवून जाईल आणि वसंतातल्या बहरलेल्या वृक्षांसमान नवविचारांच्या क्रांतीची पालवी फुटेल आणि हे ‘विश्वची माझे घर’ ही भावना पृथ्वीतलावरच्या प्रत्येकाला जाणवेल ……
         “कोरोनाच्या विषाणूचा केवढा बडेजाव,
          मानवाच्या हालचालीस मिळत नाही वाव,
         माणसाच्या नशिबीसुद्धा उरला नाही पाव,
         चुकांमधून शिकून आतातरी सुधर राव …
                 

     घरी रहा सुरक्षित रहा.

Leave a Comment