भारताच्या संस्कृतीचा दृष्टीला अचंभित करणारा देखावा आणि त्याला सोन्याच्या दागिन्यांची जोड हा मेळ कुणाच्याही दृष्टीला नक्कीच भुरळ पाडेल. पूर्वीच्या काळापासून धार्मिक कार्ये असो वा शुभ कार्ये, सोन्याच्या लखलखतेने आपल्या विविध कार्यांमध्ये एक वेगळीच चकाकी आल्याचे आपल्यास जाणवते. हे अनमोल सोन्याच्या दागिने सध्या चर्चेचा विषय ठरत आहे कारण सरकारने दागिन्यांच्या हॉलमार्किंगबद्दल लागू केलेले नवीन नियम. तर आजच्या लेखातून आपण याबद्दल माहिती जाणून घेवूया.’हॉलमार्किंग‘ ही सोन्याची आणि चांदीची शुद्धता प्रमाणित करण्याची पद्धत आहे ज्याद्वारे बनावट आणि मिश्रणयुक्त दागिन्यांच्या विक्रीला चाप लावून ग्राहकांची होणारी फसवणूक कमी करण्याचे सरकारच्या हाती असलेले एक प्रभावी साधन आहे. त्याचप्रमाणे जगातील सर्वात मोठे सोन्याच्या बाजाराचे केंद्र निर्माण करणे आणि निर्यातीचे प्रमाण वाढवणे हेही सरकारने उद्दिष्ट ठरविले आहे. भारतात सोने व चांदी यांच्या विविध प्रकारच्या वस्तू आपण वापरतो पण त्या किती प्रमाणात शुद्ध आहेत हे घाईगडबडीत आपण तपासून घेण्यास विसरतो, त्याकरिता 1986 साली Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution च्या अंतर्गत Bureau Of Indian Standard ची स्थापना करण्यात आली जेणेकरून सर्व विकले जाणारे सोने व चांदी यांच्या वस्तू शुद्ध आणि प्रमाणबद्ध असायला हव्यात यावर BIS च्या रूपाने भारत सरकार लक्ष ठेऊन असते. हॉलमार्क चे अधिकृत चिन्ह असल्याने त्यात कोणतीही भेसळ अथवा कमी दर्जाचे सामान मिळाल्याची शक्यता कमी होते. हॉलमार्क मुळे ग्राहकांना सोने किंवा चांदी ही शुद्ध आणि प्रमाणबद्ध आहे याची खात्री मिळते.
दागिन्यांची ‘ हॉलमार्किंग ‘ कशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक होण्यापासून रोखू शकते?
सोने दागिन्यांसाठी असलेल्या हॉलमार्क प्रणाली मध्ये खालील दिलेल्या क्रमाने गोष्टी अंतर्भूत आहेत.
1. BIS चे चिन्ह (लोगो)
2. सोन्याची शुद्धता –
22 कॅरेट साठी 22K916 (येथे 916 म्हणजे 91.6% शुद्ध सोने आहे)
18 कॅरेट साठी 18K750 ( येथे 750 म्हणजे 75 टक्के शुद्ध सोन्याचा वापर)
14 कॅरेट साठी 14K585 (येथे 585 म्हणजे 58.5 टक्के शुद्ध सोन्याचा वापर) अश्याप्रकारे दर्शवण्यात येते.
3. शुद्धता तपासणी केंद्राचे चिन्ह
4. सोनाराचे/ व्यावसायिकाचे चिन्ह
5. हॉलमार्किंग केल्याचे वर्ष
भारत सरकारने 16 जून 2021 पासून 256 जिल्ह्यामध्ये हॉलमार्क अनिवार्य केलेले आहे व एकूण 945 तपासणी आणि हॉलमार्किंग(Assaying & Hallmark Center) केंद्र उभारलेले आहेत. येत्या काळात त्यांची संख्या वाढवून देशभर सर्वत्र हा नियम लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार सोनारांना 14, 18 व 22 कॅरेट सोने हे विकता येईल व 20, 23, 24 कॅरेट सोन्यालाही हॉलमार्किंगची परवानगी देण्यात आलेली आहे. ज्या सोने व चांदी व्यापाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 40 लाख पेक्षा अधिक असेल त्यांना सध्या हॉलमार्क असलेले आभूषण विकणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तसेच सोन्याची घड्याळे, फाऊंटन पेन, कुंदन, पोलकी यांना हॉलमार्किंगपासून सूट देण्यात आलेली आहे.
ग्राहकांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्राहक त्यांचे हॉलमार्क नसलेल्या जुन्या दागिन्यांची सोनारांकडे विक्री करू शकतात. सोनारांनी हॉलमार्क नसलेले दागिने विकल्यास त्यांना 1 वर्षाचा कारावास व दागिन्यांच्या किमतीच्या पाचपट दंड भरावा लागू शकतो. तसेच आपल्याकडील जुने दागिने आपण नजीकच्या केंद्रावर जावून प्रमाणित करून घेवू शकतो. सोन्याच्या हॉलमार्किंगसाठी 35 रुपये प्रति लेख आणि 200 रुपये सेवा कर आणि लागू असणारी इतर शुल्क अतिरिक्त असेल व चांदीच्या दागिन्यांसाठी 25 रुपये प्रति लेख आणि 150 रुपये सेवा कर व इतर अतिरिक्त शुल्क. अशाप्रकारे नवीन नियमांमुळे ग्राहकांनी घाबरून न जाता सध्या विना हॉलमार्क दागिन्यांची सोनारांकडे बिनधास्त विक्री करावी पण पुढच्या वेळेस सोने खरेदीकरतांना हॉलमार्क बघूनच दागिन्यांची खरेदी करावी.
-ऋषिकेश उगले.
-सौरभ बिनवडे.
हेही वाचा –पोस्टाचा पिनकोड ६ अंकीच का असतो?
हेही वाचा –‘शस्त्रसंधीचे उल्लंघन’ म्हणजे काय?
Interesting ????
Very interesting ✨
Very interesting ✨
Very nice
Very nice