धो-धो पडणारा पाऊस असो किंवा सुसाट वाहणार वादळ, प्रचंड तांडव करणारा त्सुनामी असो किंवा जनजीवन विस्कळीत करणारा महापूर. ज्या दलाच्या सेवेने भारताच्या आपत्ती व्यवस्थापनाची सुरुवात होते, संकटात अडकलेल्या जनतेला सुरक्षित सुटकेची शाश्वती मिळते तसेच भारताचे ‘ संकटमोचक ‘ या नावाने ज्यांची ख्याती आहे त्या “NDRF” या दलाविषयी आपण आजच्या लेखात सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.
NDRF म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल. भारताला ओडिसा चक्रीवादळ (1999),गुजरात भूकंप(2001) व हिंदी महासागरातील त्सुनामी (2004) या सारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. त्यामुळे या संकटांचा अनुभव घेवून 26 डिसेंबर 2005 मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाची धोरणे, योजना आणि मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) ची स्थापना करण्यात आली.तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत NDRF (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ) 2006 मध्ये स्थापन करण्यात आले. हे दल भारतीय “गृह मंत्रालय” च्या अंतर्गत येते.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत आहे. एनडीआरएफ च्या प्रमुखांना महासंचालक म्हणून नियुक्त केले गेले आहे. एनडीआरएफचे महासंचालक हे भारतीय पोलिस संघटनांकडून प्रतिनियुक्तीवर आयपीएस अधिकारी असतात. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामध्ये एकूण 12 बटालियन आहेत. त्या मध्ये (3) सीमा सुरक्षा दल (BSF), (3) केंद्रीय राखीव पोलिस दल(CRPF) , (2) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(CISF) , (2) इंडो–तिबेट सीमा पोलिस(ITBP) आणि (2)सशस्त्र सीमा बल (SSB) मधील जवानांचा यामध्ये समावेश असतो. प्रत्येक बटालियन मध्ये अभियंता, तंत्रज्ञ, इलेक्ट्रीशियन, श्वान पथक आणि वैद्यकीय / पॅरामेडिक्ससह 45 जवानांची,18 स्वयंपूर्ण तज्ञांची, शोध आणि बचाव पथके आहेत. प्रत्येक बटालियनची एकूण संख्या ११४९ आहे.
“आपदा सेवा सदैव ” आपत्ती प्रतिसाद दलाचे ब्रीदवाक्य आहे. त्याच्यानुसार नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्तीला प्रतिसाद देण्याची क्षमता या दलाने विकसित केली आहे. तसेच जैविक, रासायनिक, अणुशक्तीविषयक आपत्तीच्या बचावकार्यासाठी त्यांना प्रशिक्षणाद्वारे सक्षम केलेले आहे. भारतात एकूण 12 बटालियन तैनात असून,त्या प्रत्येक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीला प्रतिसाद देण्यासाठी सदैव सज्ज आणि कार्यक्षम आहेत.
गुवाहाटी, कोलकाता, ओडिसा, अरकोकोनम (तमिळनाडू), पुणे, गांधीनगर, वाराणसी, आंध्रप्रदेश, पटना, भतिंडा (हिमाचल प्रदेश), गाझियाबाद (UP) व आसाम या ठिकाणी NDRF च्या बटालियन आपत्तीला प्रतिसाद देण्यासाठी तैनात आहेत.
बऱ्याचवेळेस पावसाळ्यात पुर आल्यावर वृत्तपत्रांमधून किंवा न्युज चॅनलच्या माध्यमातून आपण ऐकत असतो की NDRF च्या दलाला तातडीने बोलावण्यात आले आहे. नेहमी चर्चेत असणाऱ्या ह्या दलाबद्दल या लेखाद्वारे आपल्या वाचकांपर्यंत माहिती पोहचवण्याचा आमचा हा एक प्रयत्न…
Source-www.ndrf.gov.in
Read More-म्युकरमायकोसिस(काळी बुरशी) म्हणजे काय ?
Read More-पोस्टाचा पिनकोड ६ अंकीच का असतो?