भारतातील National Highway ला नंबर कशा प्रकारे दिले जातात ?

      भारत देश जगातील दुसरा सर्वात जास्त रस्त्याचे जाळे निर्माण करणारा देश आहे. भारतातील रस्त्यांची एकूण लांबी 54,82,209 लाख किमी आहे. याला देशाच्या दळण-वळण क्षेत्राचा भक्कम पाया मानले जाते आणि आर्थिक प्रगतिमधला एक महत्वाचा घटक म्हणूनही याचा उल्लेख केलेला दिसतो. ज्यावेळेस आपण कोणत्या अनोळखी ठिकाणी जातो तेव्हा ह्या महामार्गाचे क्रमांक आपले दिशादर्शक म्हणून भूमिका पार पाडतात. तर ह्या राष्ट्रीय महामार्गाला क्रमांक कशाप्रकारे दिले जातात हे आपण आजच्या लेखात जाणून घेवूया.

       भारतातील महामार्गाचे नाव देण्यासाठी खालील नियमांचा अवलंब केला जातो
(नियम १) -ज्या महामार्गाची दिशा उत्तरदक्षिण असते त्याला सम संख्येचा क्रमांक दिला जातो,उदा. NH2, NH68 इत्यादी.त्यानंतर उत्तर – दक्षिण दिशा असणारा महामार्ग भारताच्या पूर्व भागात आहे की पश्चिम भागात ह्याची नोंद घेतली जाते. ह्या सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर नियमानुसार उत्तर – दक्षिण दिशा असणाऱ्या आणि भारताच्या पूर्व भागात असणाऱ्या महामार्गाला कमी संख्येचा क्रमांक दिला जातो आणि भारताच्या पश्चिम भागात असणाऱ्या महामार्गाला मोठ्या संख्येचा क्रमांक दिला जातो म्हणजेच पूर्वेकडून – पश्चिमेकडून क्रमांक वाढत जातो.
याला आपण उदाहरणाद्वारे समजून घेवू – 
       (NH2) — यामध्ये 2 ही सम संख्या आहे म्हणजेच महामार्गाची दिशा उत्तर-दक्षिण आहे. त्यानंतर 2 ही छोटी संख्या आपल्याला हे सांगते की, महामार्ग भारताच्या पूर्व भागात आहे(आसाम ते मिझोराम).
      (NH68) — यामध्ये 68 संख्या आपल्याला सांगते की या महामार्गाची दिशा उत्तर – दक्षिण आहे, तसेच 68 मोठी संख्या असल्यामुळे आपण समजू शकतो की, हा महामार्ग भारताच्या पश्चिम भागात आहे (राजस्थान ते गुजरात).
       (नियम 2)- ज्या महामार्गाची दिशा पूर्व पश्चिम असते त्याला विषम क्रमांक दिला जातो. उदा-NH 1, NH-67.त्यानंतर पूर्व – पश्चिम दिशा असणारा महामार्ग भारताच्या उत्तर भागात आहे की दक्षिण भागात याची माहिती घेतली जाते. ह्या सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर नियमानुसार, पूर्व – पश्चिम दिशा असणाऱ्या आणि भारताच्या उत्तर भागात असणाऱ्या महामार्गाला लहान संख्या असणारा क्रमांक दिला जातो व भारताच्या दक्षिण भागात असणाऱ्या महामार्गाला मोठ्या संख्येचा क्रमांक दिला जातो.
याला आपण उदाहरणाद्वारे समजून घेवू – 
     (NH 1) — यामध्ये 1 ही विषम संख्या आहे म्हणजेच मार्गाची दिशा ही पूर्व – पश्चिम असेल. त्यानंतर 1 ही लहान संख्या असल्या कारणाने ती आपल्याला महामार्ग भारताच्या उत्तर भागात (जम्मू काश्मीर) येथे असल्याची माहिती देते.
      (NH 67) — यामध्ये 67 ह्या विषम संख्येनुसार महामार्गाची दिशा पूर्व – पश्चिम आहे. त्यानंतर 67 ही मोठी संख्या असल्याने आपल्याला हे दर्शवते की, महामार्ग भारताच्या दक्षिण भागात आहे (आंध्रप्रदेश ते कर्नाटक) .
      (नियम 3) — ज्या महामार्गाला तीन अंकी क्रमांक दिलेला असतो तो मुख्य महामार्गाचा सहाय्यक मार्ग असल्याची माहिती देतो.
 उदा. NH 44हा महामार्ग (जम्मूकाश्मीर ते कन्याकुमारी) उत्तरदक्षिण दिशेने जातो. त्यामध्ये 344 हा सहाय्यक मार्ग (हरियाणा ते उत्तराखंड) जोडला जातो. 344 क्रमांक आपल्याला पुढीलप्रमाणे माहिती देतो – यामधील पहिला अंक 3, जी विषम संख्या आहे आणि ती आपल्याला सहाय्यक मार्गाची दिशा पूर्व – पश्चिम असल्याची माहिती देते. तसेच 44 संख्या मुख्य महामार्गाबद्दल माहिती देते. 
        तसेच 444 हा सहाय्यक मार्ग( जम्मू ते काश्मीर) जो NH-44 ला जोडला जातो, तो पुढीलप्रमाणे माहिती दर्शवतो-पहिला अंक 4 ही सम संख्या असून ती सहाय्यक मार्गाची दिशा उत्तर – दक्षिण असल्याची माहिती देते आणि 44 हा महामार्गाची माहिती देतो.
         ( नियम 4) — A,B,C,D ज्यावेळेस तीन अंकी नंबर सोबत जोडले जातात, ते सहाय्यक मार्गाच्या शाखा दर्शवतात. उदा. (444 A)- ही 444 ह्या सहाय्यक मार्गाची शाखा आहे.
         आजच्या या लेखातून आपल्या वाचकांना कधीही जास्त प्रकाशझोतात नसणाऱ्या विषयाबद्दल सोप्या पद्धतीने माहिती उपलब्ध करून देण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न…
                                               -ऋषिकेश उगले .
                                               -सौरभ बिनवडे .

Leave a Comment