भारतामध्ये मुलांना कायदेशीरपणे दत्तक घेण्याची प्रक्रिया कशाप्रकारे अवलंबिली जाते?

        सध्याच्या अवघड काळाने घात केला आणि अनेक चिमुकल्यांच्या डोक्यावरचं हक्काचं छत्र म्हणजे त्यांचे आई – वडील यांना त्यांनी ह्या काळात गमावलं. याच्या बातम्या जेव्हा हवेच्या वेगाने सर्वत्र पसरू लागल्या तेव्हा अनेकांच्या काळजाला पाझर फुटला आणि मदतीचा पूर चिमुकल्यांसाठी वाहून आला. त्याचप्रमाणे त्यांच्या डोक्यावर मायेचं छत्र राहावं यासाठी अनेक जणांनी दत्तक घेण्याची जबाबदारीही स्वीकारली. तर आजच्या लेखात आपण भारतात दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे हे जाणून घेवू.

         भारतामधील मुलांना दत्तक घेण्यासाठी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) ही महिलाबालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक नोडल संस्था आहे. देशांमधील व आंतर-देशी दत्तकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही संस्था कार्य करत असते. ह्या संस्थेच्या माध्यमातून न जाता दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जर आपण मुलांना दत्तक घेतले तर तुम्ही अनावधानाने बाल तस्करीच्या नेटवर्कमध्ये गणले जाऊन तुमच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येते. 
भारतामध्ये दत्तक घेण्यासाठी पात्रता काय असते– 
1. भारतीय रहिवासी, NRI( Non resident Indian) , विदेशी नागरिक हे भारतात मुलांना दत्तक घेवू शकतात पण तिघांसाठी वेगवेगळी प्रक्रिया अवलंबली जाते.
2. पुरुष, महिला, विवाहित व अविवाहित कोणताही व्यक्ती मुलांना दत्तक घेवू शकतो.
3. जर एखाद्या विवाहित जोडप्यास दत्तक घ्यायचे असेल तर त्यांचा कमीतकमी 2 वर्षांचा स्थिर संसार असावा आणि दत्तक घेण्यास दोघांचीही संमती असणे गरजेचे आहे.
4. दत्तक घेणारे मूल आणि त्याचे होणारे आई – वडील यांच्यात 25 वयापेक्षा कमी अंतर नसावे. 
       CARA चे संचालक दीपक कुमार त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगतात की, ” 2018-19 नुसार देशामध्ये 3374 मुलांना कायदेशीर पद्धतीने दत्तक देण्यात आले व 653 मुलांना दुसऱ्या देशात दत्तक देण्यात आले. तसेच स्वतःचे एक मूल असतांनाही दुसरे मूल दत्तक घेण्यास पालकांनी पसंती दाखवली आहे. त्यात सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे सध्याच्या काळात मुलींना दत्तक घेण्याचा ओघ पालकांमध्ये जास्त दिसून येत आहे जो समाजाच्या मानसिकतेला एक नवी दिशा देण्याचं काम येत्या काळात करेल असा विश्वास आपण व्यक्त करू शकतो.”
        कोरोनाच्या या अवघड काळात लोकांच्या भावनांशी खेळून लहान मुलांची तस्करी करणाऱ्या अमानुष टोळ्या सक्रिय झाल्या आहेत तरी अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यामध्ये आपल्या नागरिकांची फसवणूक होवू नये म्हणून हा लेख प्रस्तुत करण्यात आला आहे. भारतातील दत्तक घेण्याची प्रक्रिया अजून सविस्तरणे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आपण अचूक माहिती घेवू शकतात.
                                                   -ऋषिकेश उगले.
                                                   -सौरभ बिनवडे.
सविस्तर वाचा-Child Adaption Resource Authority

Leave a Comment