मधमाशीने तुम्हाला डंक मारल्यास होणार नाही सांधेवात ?

        आपल्या सभोवताली कुठेही मधमाशी दिसल्यास आपण हा विचार करतो की ‘ ती मला चावेल ‘, पण जर मी तुम्हाला सांगितले की, मधमाशीने आपल्याला डंक मारल्यास त्यामधून निघणाऱ्या द्रव्यामुळे आपल्याला सांधेवात होण्याचा धोका कमी होतो तर तुम्हाला पहिल्यांदा ऐकून नवलच वाटेल. तर अश्या सर्व महत्त्वाच्या बाबी समजून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा, तुमचे मधमाशीबद्दलचे बहुतांश गैरसमज हया माध्यमातून दूर होतील. 

मधमाशीने तुम्हाला डंक मारल्यास होणार नाही सांधेवात ?


          मधमाशी पालनात एका लाकडी पेटीमध्ये मधमाश्यांचा समूह असतो त्याला ‘ कॉलनी ‘ म्हणतात. आपल्या भारतात एकूण 25 लाख मधमाश्यांच्या कॉलनी अस्तित्वात आहेत या उलट आपला शेजारी चीन देशात 2 करोड मधमाशांच्या कॉलनी अस्तित्वात आहेत. मधमाशांमुळे अर्थव्यवस्थेला तीन महत्त्वाचे फायदे होतात- रोजगार निर्मिती, पिकांचे परागीभवन व उत्पादनामध्ये 30 ते 40 टक्के वृद्धी. 

▪️ मधमाशांच्या प्रामुख्याने चार प्रजाती आढळतात- 

1. आग्या मधमाशी (रॉक बी)- 

 लांब उंचावर सूर्यप्रकाश पोहोचेल अशा ठिकाणी ह्या माशा पोळे बनवतात. रागीट स्वभावाच्या असल्याकारणाने यांना पाळले जात नाही. यांच्याद्वारे प्राप्त होणारे मध सगळ्यात चांगल्या गुणवत्तेचे असते. 

2. सातेरी मधमाशी (अपिस सेरेना इंडिका)- 

 ही प्रजाती प्रामुख्याने सावलीच्या भागात आढळते. एका पोळ्या मधून प्रतिवर्षी 20 किलोच्या आसपास मध काढता येते.केरळ सारख्या भागात ही मधमाशी रबर झाडाच्या प्रभावामुळे 25 ते 30 किलो / वर्ष इतक्या प्रमाणात मध उपलब्ध करून देते व तिचा स्वभाव शांत आहे.

3. काटेरी मधमाशी – 

कमी प्रकाशात वास्तव्य असते व कमी प्रमाणात मध गोळा करते. 

4. मेलिफेरा मधमाशी ( विदेशी प्रजाती) 

सर्वात जास्त पाळली जाणारी प्रजाती. 1 कॉलनी साधारणतः 40 ते 50 किलो/ वर्ष मध गोळा करून देते.

▪️ मधमाशांमधील कामाचे व्यवस्थापन- 

1. राणी माशी – 2 ते 2.5 वर्ष जीवन असते, एका दिवसात 500 ते 800 अंडे देण्याची क्षमता.

2. कामगार माशी – 1.5 महिना जीवनकाळ, आपल्याला डंक कामगार माशीद्वारे मारला जातो.

3. ड्रोन्स – डंक मारत नाहीत फक्त प्रजनन करण्यासाठी उपयुक्त, त्यानंतर मरून जातात.

         मधमाशा प्रामुख्याने फुलांमधील मकरंद व परागकण यांना गोळा करून त्यामधील पाण्याचे प्रमाण कमी करतात व त्यानंतर आपल्याला मध मिळते. ज्यावेळेस फुलांवरून मकरंद जमा करण्यात येतो तेव्हा त्यामध्ये 80 टक्के पाणी व 20 टक्के साखर असते पण मधमाश्या मेहनत करून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करतात, त्यामध्ये परागकण मिसळवतात व या सर्व प्रक्रियेतून मधनिर्मिती होते. 

         मधनिर्मितीसाठी लागणारे परागकण पेरू, बाजरी, ज्वारी, मका यांसारख्या पिकांमधून गोळा केले जातात तर मकरंद जमा करण्यासाठी तुर , उडीद यांसारख्या डाळी,चिंच यांसारख्या वनस्पतींवर अवलंबून असतात. प्रत्येक वेळेस वृक्षारोपण करताना मधमाशांच्या दृष्टीने विचार करायला हवा की, कोणत्या झाडांच्या माध्यमातून त्यांना परागकण किंवा मकरंद उपलब्ध होऊ शकेल. जसे आंब्याचे झाड मधमाशांसाठी फारसे उपयोगी ठरत नाही कारण त्यांच्यात परागकण व मकरंदाचे प्रमाण कमी असते. भेंडी, टोमॅटो, मिरची व वांगे यांसारख्या भाज्यांवर मधमाशा अवलंबून राहत नाही कारण यामध्ये आढळणारा लायकोपरसिकम हा पदार्थ त्यांना आवडत नाही.

         मधमाशीचा पिवळसर पोळ ज्यामध्ये मध साठवले जाते तो मेणाचा उपयोग करून बनवण्यात येतो. मधमाशांना 1 किलो मेण बनवण्यासाठी 8 किलो मध चघळावे लागते किंवा 20 लिटर मकरंद चघळावे लागते तेव्हाच मेणाची निर्मिती होते व त्याद्वारे मधमाशीचे पोळे बनवले जाते. मेणासोबत काही चिकट पदार्थ मिसळले जातात ज्याचे मिश्रण मिळून मधमाश्या त्यांच्या ‘ घराचे प्लास्टर ‘ बनवतात ज्याला ‘ प्रोपोलीस ‘ असे म्हटले जाते ज्याची बाजारातील किंमत 3000 रुपये प्रतिकिलो इतकी आहे. यामध्ये बुरशीविरोधी व बॅक्टरियाविरोधी गुणधर्म असल्याकारणाने त्यांची जास्त मागणी वाढत आहे.

              ज्यावेळेस आपल्याला माशी डंक मारते त्यावेळेस एक द्रव्य आपल्या शरीरात सोडले जाते ज्यामुळे आपल्याला सांधेवात होण्याचा धोका कमी होतो. ह्या मधमाशीच्या विषाची बाजारातील किंमत 1 हजार रुपये प्रति 1 ग्राम इतकी जास्त आहे. मधमाशी कधीही स्वतःहून आपल्याला डंक मारणार नाही कारण आपल्याला डंक मारल्याबरोबर तिच्या पोटामधील भाग तुटला जातो व ती मरण पावते म्हणजेच आपण जर घाबरलो नाही व तिच्या कामात व्यत्यय न आणता शांत बसलो तर ती काहीही करणार नाही. जगातील 80 टक्के परागीभवन मधमाशीद्वारे केले जाते जर आपण यांची संख्या कमी करायला लागलो तर जगात अन्न सुरक्षेचे संकट उभे राहू शकते.

          मधमाशीद्वारे जमा केले जाणारे परागकण यांमध्ये प्रोटीन चे प्रमाण जास्त असते त्यामुळे आता बाजारात पोलनच्या गोळ्या विक्रीस येत आहेत. 100 ग्रॅम चिकन खाल्यावर जेवढे प्रोटीन मिळते तेवढे फक्त 5 ग्रॅम पोलन गोळी खाल्यावर मिळते. तसेच विविध ॲलर्जी दूर करण्यासाठी देखील यांचा वापर झपाट्याने वाढत आहे. याचे 1 ग्रॅम प्रति दिन सेवन केल्यास शरीरास फायदा होतो. 

          चांगल्या गुणवत्तेच्या मधामध्ये सुक्रोसचे प्रमाण कमी असते व फ्रक्टोसचे प्रमाण जास्त असते. बाहेरील देशांमध्ये मधाची निर्यात करताना त्यामधील वरील साखरेचे प्रमाण तपासले जाते. 5 लाख टन मधनिर्मिती प्रतिवर्ष करून चीन हा जगातील सर्वात जास्त मधनिर्मिती करणारा देश आहे तर जर्मनी हा देश 90 हजार टन प्रति वर्ष मधाची आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. आपला भारत प्रतिवर्ष 1 लाख टन प्रतिवर्ष इतकी मधनिर्मिती करतो. येणाऱ्या काळात योग्य प्रशिक्षण देवून योजनांच्या माध्यमातून आपणही जागतिक स्तरावर अग्रेसर होवू शकतो.

         मधमाशी लाल रंग बघू शकत नाही त्याला ती जांभळा रंग समजते. तसेच वातावरणातील हानिकारक UV रंगांना ती डोळ्यांनी बघू शकते. जंगलातील अस्वलाला मध हा पदार्थ खूप आवडतो त्यामुळे सहसा ही पोळे झाडाच्या वर बनवली जातात. तरीही अस्वल मधाच्या वासाने झाडावर चढतो, पोळ्यांमधील मध आवडीने खातो, माशा त्याला खूप चवण्याचा प्रयत्नही करतात पण जाड कातडी असल्याने त्याला काहीही फरक पडत नाही अशी ही निसर्गाची किमया आहे. राणी मधमाशीला व नवजात कामकरी माशीस रॉयल जेली नावाचा पांढरा पदार्थ दिला जातो. तो वाढीसाठी सर्वात जास्त पोष्टिक असतो. बाजारात त्याची विकण्यासाठी किंमत 50 हजार रुपये प्रति किलो इतकी आहे. 

          मध वापरतांना कधीही ते उघडे ठेवू नये कारण त्याच्यामध्ये लगेच वातावरणातील ओलावा ओढून घेण्याची क्षमता असते. सध्या बाजारात एलोवेरा, जामुन अश्या विविध वनस्पतीच्या मधाची विक्री होतांना आपल्याला दिसते. हे विशिष्ट मध बनवण्याची पद्धत अशी की, एका शेतात विशिष्ट वनस्पती जसे उदा. कोरफड चे उत्पादन केले जाते. त्याठिकाणी मधमाश्या सोडल्या जातात व त्यांनी आणलेल्या परागकण, मकरंद पासून बनलेले एलोवेरा मध म्हणून विकले जाते. अश्या प्रकारे ह्या सृष्टीच्या संवर्धनासाठी लढणाऱ्या ह्या मधमाशी नावाचा कीटकास ‘राष्ट्रीय कीटक’ म्हणून संमती देण्याचा विचार व्हावा याकडे आपण सरकारचे लक्ष वेधले पाहिजे.

Read More – ‘चेक बाऊन्स’ झाल्यावर होणार कारावासाची शिक्षा !!!

Read More – पोस्टाचा पिनकोड ६ अंकीच का असतो?

Leave a Comment