म्युकरमायकोसिस(काळी बुरशी) म्हणजे काय ?

         कोरोनाच्या विळख्यात गुंतलेल्या भारताला सोडवण्यासाठी सर्व स्तरावर जोमाने प्रयत्न सुरू असताना ‘ म्युकरमायकोसिस’ ह्या आजाराने भारताच्या विविध भागात आपले अस्तित्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. जेथे कोरोनापासून सुटकेचा आशेचा किरण प्रकाशाची जाणिव करुन देत होता,तेव्हाच ह्या बुरशीच्या रूपाने चिंतेचे काळे ढग भारताच्या समोर येवून उभे राहिले आहेत. तर आजच्या ह्या लेखामधून आपण ‘म्युकरमायकोसिस’ आजाराबद्दल अचूक आणि सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

 * म्युकरमायकोसिस कशामुळे होवू शकतो
        आसपासच्या वातावरणातील बुरशीजन्य कणांच्या संपर्कात आल्याने म्युकरमायकोसिसचा संसर्ग होऊ शकतो. तसेच शरीरावर कापण्यामुळे, खरचटण्यामुळे, भाजण्यामुळे झालेल्या जखमेतून किंवा इतर प्रकारच्या त्वचारोगांमुळे झालेल्या जखमेतून या बुरशीचा शरीरात प्रवेश झाल्यामुळेही हा संसर्ग होऊ शकतो.
 *आयसीएमआरच्या निर्देशानुसार कोरोना रुग्णांमधील खालील परिस्थितीमुळे म्युकरमायकोसिस संसर्गाचा धोका वाढू शकतो-
  १. अनियंत्रित मधुमेह  
  २. स्टेरॉईडच्या वापरामुळे रोगप्रतिकारक्षमता कमकुवत होणे.
  ३. अतिदक्षता विभागात/ रुग्णालयात दीर्घकाळ दखल असणे.
  ४. अवयव प्रत्यारोपण/ ट्युमर( कर्करोगकारक पेशींची 
         उपस्थिती) नंतर सहव्याधी
  ५. व्होरिकोनॅझोल उपचार( गंभीर बुरशी संसर्गावरील उपचार)
 * या बुरशीचा कोरोनाशी कसा संबंध आहे
       कोविडमधून बरे होत असलेल्या किंवा बरे झालेल्या रुग्णांना या बुरशीचा संसर्ग होत असल्याचे प्रामुख्याने 
आढळत आहे. केवळ कोविड रुग्णच नाही ज्यांना मधुमेह आहे, अशा अनेक, ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे अशा लोकांनाही म्युकरमायकोसिस होऊ शकतो. आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती अशा बुरशीच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यास सक्षम असते. मात्र, कोविड रुग्णांवर उपचार करतांना रोगप्रतिकार दाबून टाकणारी डेक्समेथासोन सारखी औषधें असतात. या औषधांमुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्याशिवाय,जे रुग्ण ऑक्सिजन आधारावर अतिदक्षता विभागात उपचार घेत असतात, तिथे या प्रणालीमध्ये ह्युमिडीफायर असते,ज्यामुळे पाण्यातील आर्द्रतेतून बुरशी संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक कोविड रुग्णाला म्युकरमायकोसिसचा धोका संभवतो. हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे मात्र त्याचवेळी जर त्यावर योग्य आणि वेळेत उपचार केले गेले नाहीत, तर तो प्राणघातकही ठरु शकतो. आजाराचे लवकर निदान आणि उपचार यावर बरे होण्याचे प्रमाण अवलंबून असते.
  *आजाराची सामान्य लक्षणे कोणती –  
   म्युकरमायकोसिस हा आजार सायनस म्हणजेच नसिकेच्या आतल्या हाडात, नाक, दात आणि त्यानंतर डोळ्यांकडे पसरतो. नंतरच्या पातळीत हा संसर्ग फुफ्फुसे आणि मेंदूपर्यंतही पसरु शकतो. या संसर्गामुळे चेहरा आणि नाकावर काळे डाग पडतात किंवा तिथल्या त्वचेचा रंग बदलतो. दृष्टी अधू होते, छातीत दुखू लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि खोकल्यातून रक्त पडणे इत्यादी लक्षणे जाणवू शकतात.
* या आजारावर उपचार काय
      साध्या त्वचासंसर्गापासून म्युकरमायकोसिसची सुरुवात होत असली तरी तो शरीराच्या इतर भागात पसरू शकतो. यावर उपचार करताना सर्व मृत आणि संसर्ग झालेल्या ऊती शस्त्रक्रिया करून काढून टाकाव्या लागतात, त्यामुळे काही रुग्णांना वरचा जबडा गमवावा लागतो किंवा काही वेळा अगदी डोळा देखील गमवावा लागतो. तसेच 4 ते 6 आठवड्याचे इंट्राव्हेनस अँटी- फंगल उपचार, रुग्णाला संसर्गमुक्त करण्यासाठी करावे लागतात. याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होत असल्याने सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अंतर्गत औषध तज्ञ, इंटेन्सिव न्यूरॉलॉजिस्ट, कान- नाक- घसा तज्ञ, नेत्रविकारतज्ञ, दंतवैद्य, शल्यविशारद आणि इतरांचा समावेश असलेल्या एका टीमची उपचारांसाठी गरज भासते.
*ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णांनी काय खबरदारी घ्यावी – 
    ऑक्सिजनचे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या ह्युमिडीफायरमधील पाणी स्वच्छ आहे की नाही आणि ते वारंवार बदलले जात असल्याची खातरजमा करावी. पाण्याची गळती कुठेही होत नसल्याची खातरजमा करावी जेणेकरून ओल्या पृष्ठभागांवर बुरशीची वाढ होणार नाही. रुग्णांनी आपले हात त्याचबरोबर शरीर स्वच्छ ठेवून शरीराची योग्य प्रकारे स्वच्छता राखावी, असे डॉ. पॉल यांनी सांगितले आहे.
* मधुमेह असणारे रुग्ण तसेच स्टरोईड बद्दल काय आहे 
   डॉक्टरांचा सल्ला – 
    मधुमेही असलेल्या कोविड रुग्णांनी अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवणे हा सर्वात आधी केल्या जाणाऱ्या प्रतिबंधक उपचारांपैकी एक असल्याचे आयसीएमआरने सांगितले आहे. स्वयं उपचार आणि स्टेरॉईडचा प्रमाणाबाहेर वापर यामुळे जीवावर बेतू शकते आणि म्हणूनच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसारच औषधे घेतली पाहिजेत.
    स्टेरॉईडच्या अयोग्य वापरांमुळे होणाऱ्या विपरित परिणामांबाबत बोलताना नीती आयोगाचे (आरोग्य) सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितले की, कोविड-19 च्या संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात स्टेरॉईडचा वापर कधीही करू नये. रुग्णाने योग्य त्या औषधांचाच वापर केला पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विशिष्ट दिवसच या औषधांचा वापर केला पाहिजे. औषधांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्यांचा तर्कसंगत वापर झाला पाहिजे.
 * रुग्णांनी बरे झाल्यावर काय काळजी घ्यावी
       कोविडमधून बरे झाल्यानंतर वर उल्लेख केलेल्या लक्षणांवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवावे आणि कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये कारण रुग्ण बरे झाल्यानंतर अनेक आठवडे किंवा अगदी महिन्यांनी देखील हा संसर्ग झाल्याची उदाहरणे आढळली आहेत. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी रुग्णांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार स्टेरॉईड्सचा आवश्यक तितकाच वापर कराहीवा. या संसर्गाचे वेळेवर निदान झाल्यास त्यावरील उपचार सुलभ होतात.
        अशाप्रकारे ह्या लेखामध्ये आपण बुरशीच्या संसर्गापासून स्वतःचा बचाव कसा करावा, त्याच्या उपचार पद्धती कोणत्या या सर्वांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. ज्याप्रकारे आपण कोरोनाशी पूर्ण ताकदीने लढा देत आहोत तसेच ह्या रोगाशी लढण्यात आपण सक्षम आहोत पण त्यासाठी आपले हत्यार आहेत जागरूकता, संयम, शारीरिक स्वच्छता आणि मानसिक शांतता. भारताच्या इतिहासामध्ये असे अनेक शत्रू येवून गेले पण त्या सर्वांना पळवून लावणारा आपला भारत देश आहे. एकजुटीने आणि सहकार्याने आपण नक्कीच येणाऱ्या काळात या रोगाचाही नक्कीच नायनाट करू
    नोंद -वरील सर्व माहिती ही Government website- PIB India यांच्या निर्देशानुसार अचूक आणि सविस्तरपणे आपल्या समोर प्रस्तुत करण्यात आली आहे.

Leave a Comment