साबुदाणा कसा बनवला जातो व कोणत्या भागात त्याची शेती केली जाते.?

      महाशिवरात्र असो किंवा आषाढी एकादशी, उपवास असो किंवा खिचडीचा खमंग वास भारतीयांच्या जेवणात स्वतःच एक वेगळेच स्थान निर्माण करणाऱ्या साबुदाण्याला आपण कधी विसरू शकत नाही. आपल्या पूर्वजांपासून चालत आलेला हा पदार्थ धार्मिक कार्यांमध्ये व अनेकांच्या चवीला तृप्त करण्यासाठी आपल्या जेवणात ठेवला जातो. तर आजच्या या लेखातून आपण साबुदाणा कसा बनवला जातो याबद्दलची मजेशीर माहिती जाणून घेणार आहोत.

        साबुदाणा हा भारतीय जेवणातील एक महत्वाचा खाद्यपदार्थ आहे. भारतामध्ये कासावा/ टॅपिओका झाडाच्या मुळांचा साबुदाणा बनवण्यासाठी उपयोग केला जातो त्याचप्रमाणे आफ्रिकन देशांमध्ये पामसारख्या झाडाच्या खोडापासून त्याला बनवण्यात येते. या मुळांमध्ये 30 टक्के स्टार्च सापडते जो अन्नामधील एक महत्वाचा घटक आहे. भारतात 19 व्या शतकापासून साबुदाणा खाण्यास सुरुवात झाली पण याची सुरुवात चीनमध्ये 1170 पासूनच झाली होती. 
      भारतामध्ये 1860 सालापासून केरळच्या त्रावणकोर येथील राजांनी कासावाची शेती सुरु करण्यास प्राधान्य दिले होते. या साबुदाण्याचे विविध खाद्यपदार्थ बनवून त्यांनी त्याचा सर्वत्र फैलाव केला. इंडोनेशिया जगातील साबूदाणा बनवणारा सर्वात अग्रेसर देश आहे. तसेच भारतामधील केरळ, तमिळनाडू हे या उत्पादनात अग्रेसर मानले जातात. हे झाड उष्णकटिबंधीय, दमट हवामानात चांगल्याप्रकारे उगवते ज्याला गारा, बर्फ यांचे हवामान सहन होत नाही त्यामुळे ते भारताच्या दक्षिण भागात उगवले जाते.
 साबुदाणा बनवण्याची प्रक्रिया – 
1. कासावा झाडाच्या मुळांची 6 ते 8 महिन्यांनी कापणी करण्यात येते. एका झाडापासून साधारणतः 4 ते 8 मुळे मिळतात. त्यानंतर त्यांना काळजीपूर्वक वेगळे करावे लागते अन्यथा ते खराब होवून त्यातील स्टार्च कमी होते.
2. सर्व भागांतून जमलेला माल कारखान्यात पाठवला जातो. येथे झाडाची मुळे स्वच्छ करून त्यांची साल काढण्यात येते आणि हे सर्व काम मोठ्या यांत्रिक पद्धतीने करण्यात येते.
3. साळलेले मुळे मशीनमध्ये दाबले जावून त्यांमधून स्टार्च बाहेर काढला जातो जो दुधासारखा दिसणारा त्याचा आर्क असतो. त्याला पुढे filter मध्ये विशिष्ट प्रक्रियेद्वारे शुद्ध केले जाते आणि एका मोठ्या पातेल्यात साठवले जाते.
4. पातेल्यामध्ये 6 ते 8 तास साठवल्यामुळे घट्ट आणि शुद्ध आर्क (स्टार्च) खाली राहतो आणि हलके अशुद्ध पदार्थ वरती तरंगू लागतात जे वेगळे केले जातात.
उरलेला शुद्ध आर्क पुढे साबुदाणा बनवण्यात वापरला जातो. त्याला चाळणी मधून काढण्यात येते व त्याचे छोट्या दाण्यात रूपांतर होते. 
5. त्यानंतर वाफ देवून दाण्यांमध्ये मऊपणा आणला जातो व नंतरच्या प्रक्रियेत साबुदाण्याला उन्हात किंवा मशीनद्वारे गरम करून पक्के केले जाते. अशाप्रकारे बनलेला साबुदाणा पांढऱ्या रंगाची पॉलिश करून आपल्यापर्यंत पोहचवला जातो.
 साबुदाणा खाण्याचे फायदे –
        जास्त प्रमाणत स्टार्च असल्यामुळे तो आपल्याला ऊर्जा देण्यास मदत करतो, शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत करतो, calcium चे प्रमाण चांगले असल्यामुळे हाडांना मजबुती देण्यास फायदेशीर ठरतो यामुळे आपल्या जेवणात त्याला स्थान दिल्याने आपल्याला अनेक शारीरिक फायदे होतात.
                                                                  -ऋषिकेश उगले.
                                                                  -सौरभ बिनवडे. 

Leave a Comment