१ मे महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा केला जातो ?

                        सह्याद्रीच्या कपारीतून अंगात स्फूर्ती भरणारा इतिहास,विविध सामाजिक व शैक्षणिक चळवळीचं उगमस्थान,जेथे लावणीच्या ठेक्यावर संस्कृतीच मराठमोळ रूप अनुभवायला मिळत ,हिरव्यागार निसर्गाच्या शालुमधे वसलेला हा प्रदेश, मराठी साहित्याचं माहेरघर तसेच भारताच्या इतिहासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या प्रदेशाची राज्य म्हणून स्थापनेचा आजचा हा दिवस.

                    १ मे १९६० या दिवशी महाराष्ट्राला राज्याचा दर्जा मिळाला. तसेच हा दिवस पूर्ण जगात ‘जागतिक कामगार दिन’ म्हणूनही साजरा केला जातो पण, महाराष्ट्राला राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी संघर्ष का करावा लागला हे आपण आज जाणून घ्यायची गरज आहे कारण. “जे लोक इतिहास समजू शकत नाही, ते इतिहास घडवू शकत नाही.”तर ह्या संघर्षाची सुरुवात झाली१९५६पासून,ज्यावेळी राज्य पुनर्रचना आयोगाद्वारे भारतातील राज्यांच्या सीमा भाषेच्या आधारावर ठरवण्यात आल्या होत्या. त्यानुसार बॉम्बे राज्य मराठी,गुजराती,कोकणी आणि कच्छी या भाषिकांसाठी देण्यात आले. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने मराठी भाषिकांसाठी मुंबई सह वेगळ्या महाराष्ट्राची मागणी तीव्र केली. ह्या आंदोलनामध्ये सरकार आणि जनता यांच्यात झालेल्या तीव्र संघर्षामुळे १०६ आंदोलक हुतात्मे झाले. या लढ्याची गंभीरता आणि मराठी माणसाच्या आंदोलनापुढे सरकारला शेवटी नमतं घ्यावं लागलं आणि १ मे १९६० साली मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली.



या दिवशी पूर्ण महाराष्ट्रमध्ये सार्वजनिक सुट्टी असते व विविध सामाजिक,सांस्कृतिक,प्रशासकीय कार्यक्रमांचे आयोजनही उत्साहाने करण्यात येते. तसेच वर्षभरात राज्याच्या सेवेमध्ये दिलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल मान्यवरांना गौरवण्यातही येते. या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लढ्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अखंड मराठी प्रदेशासाठी ज्यांनी  आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व हुतात्म्यांना मानाचा मुजरा!

                      महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
                  जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा….!
                      
                                               –ऋषिकेश उगले .
                             

Leave a Comment