खाद्यपदार्थ खरेदी करताना जर त्या पदार्थात केशरचा समावेश असला तर आपण लगेच तो पदार्थ महाग असेल असा अंदाज लावतो. वर्षानुवर्षे खाद्यपदार्थात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या केशरची बाजारातील किंमत ३ लाख रुपये प्रति किलो इतकी का आकारली जाते याबद्दल आपण जाणून घेऊया.
इतिहास –
पूर्वीच्या साम्राज्यांमध्ये कपडे बनवणे, अत्तर बनवणे व खाद्यपदार्थांमध्ये विशिष्ट स्वाद आणण्यासाठी याचा वापर केला जात असे. इतिहासातील एका जानकारानुसार,अलेक्झांडर द ग्रेट हे आंघोळीवेळी केशरचा वापर हमखास करायचे ज्यामुळे त्यांच्या युद्धामधील जखमा लवकर भरण्यास मदत होत असे. तसेच बहुतांश राजघराण्यातील राजकुमारी त्वचेवरील सौंदर्य टिकवण्यासाठी केशरचा उपयोग करत असे.
कोणत्या देशात उत्पन्न घेतले जाते –
केशरचे फुल जांभळ्या रंगाचे असते व त्यामधल्या केशरी/गडद लाल रंगाच्या भागाला वेगळे केले जाते ज्याला आपण केशर म्हणतो. केशरचे बीज तयार होत नाही म्हणून त्याचा प्रसार मुळांचे सुधारित रूप (कॉर्म) द्वारे केला जातो. केशरला मसाला या प्रकारामध्ये वर्गीकृत केले जाते. ग्रीस देशात या पिकाचा उगम झाला व सध्या स्पेन, भारत, इराण, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया ई. देशात याचे उत्पन्न घेतले जाते. जगामधील केशरचे एकूण उत्पादन 300 टन आहे व त्यामधील 90% उत्पादन इराण या देशात घेतले जाते.
केशरची भारतातील स्थिती –
भारतामध्ये जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये हवामान अनुकूल असल्याने मोठ्या प्रमाणात केशर चे उत्पादन घेतले जाते. जम्मू काश्मीरमधील पॅम्पोर, पुलवामा, बुडगाव हे क्षेत्र तर हिमाचल प्रदेशमधील कुल्लू,मंडी,चंबा हे प्रामुख्याने केशर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. काश्मीरमधील केशर यास उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभाग, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयद्वारे भौगोलिक मानांकन (GI TAG) देण्यात आला आहे जेणेकरुन येणाऱ्या काळात केशरच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ भारतामध्ये उपलब्ध होईल.
केशरसाठी आवश्यक हवामान –
केशरच्या पिकासाठी समुद्रसपाटीपासून 1500 ते 2800 मीटर उंचीवर उत्पादन क्षेत्र निवडावे लागते त्यामुळे जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेश उत्तम पर्याय ठरतात. तसेच त्याच्या वाढीसाठी दिवसभर 8-11 तास सूर्यप्रकाश उपलब्ध असेल याची देखील खात्री करून घ्यावी लागते. एकदा याची जमिनीत लागण केल्यावर 8-10 वर्ष सतत याचे उत्पादन घेता येते. जमिनीत लागण झाल्यानंतर 3-4 महिन्यात फुले येण्यास सुरुवात होते व जुलै -ऑगस्ट दरम्यानचा कालावधी फुले कापणीसाठी उत्तम मानला जातो.
केशरची कापणी कशी केली जाते –
केशरच्या कापणीवेळी फुलांची तोडणी हाताने करावी लागते. फुलांमधला गडद लाल रंगाचा भाग कोवळा असल्याकारणाने तोडणीच्या प्रक्रियेसाठी खूप कालावधी लागतो. फुले तोडण्याची अनुकूल वेळ सूर्योदयापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत असते. त्यानंतर सर्व फुले जमा केल्यावर त्यामधील भगवा/लाल गडद भाग हाताने वेगळा केला जातो व 5-7 दिवस वाळवला जातो. अशाप्रकारे केशर विक्रीसाठी तयार होते. केशरच्या एका फुलामध्ये फक्त 3 लाल गडद रंगाचे बारीक भाग असतात व 3 पिवळ्या रंगाचे भाग असतात. येथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी की, पिवळा भाग आपल्या काहीही कामाचा नसतो. फुलातील पिवळा हा नर असून भगवा हा मादीचा अंग आहे.
केशरचे आर्थिक गणित –
1 किलो केशर बनवण्यासाठी 1.5 लाख फुलांची आवश्यकता असते व एका हेक्टरमधून साधारणतः 2.5 किलो केशर काढता येते. जेव्हा आपण 5 किलो केशर फुलांतून वेगळा करतो तेव्हा त्याला सुकविल्यानंतर तो 1 किलो वजनाचा होतो. अशा अवघड प्रक्रियेतून केशर उपलब्ध होत असल्याने त्याची किंमत जास्त असते व त्याला ‘ लाल सोने ‘ असेही संबोधले जाते. सध्या भारतात फक्त 6-7 टन उत्पादन होते तर त्याची भारतातील मागणी 100 टन एवढी आहे. ती बाजारपेठेची मागणी लक्षात घेवून केंद्र सरकारने सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मेघालय या प्रदेशात याचे उत्पादन कसे वाढवता येईल यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
Read more – भारतामधे सोन्याच्या खाणी कोठे आढळतात ?
Read more – पाऊस पडल्यावर मातीचा सुगंधी वास का येतो ?