कृषिप्रधान देश म्हणून ख्याती असलेल्या भारताच्या क्षेत्रामध्ये कोर्टातील एकूण खटल्यांपैकी एक तृतीयांश खटले जमिनीसंबंधी आहेत व त्याचा परिणाम इतर प्रलंबित खटल्यांवर पडत असतो. या सर्व खटल्यांमध्ये 7/12 चा उल्लेख बऱ्याचदा केलेला आपल्याला आढळतो. नुकत्याच जाहीर झालेल्या सरकारच्या स्वामित्व योजनेनुसार सर्व जमिनीचे तपशील हे डिजिटल करण्यावर भर दिला जाणार आहे जेणेकरून कोर्टात प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करता येईल. तर आजच्या या लेखातून आपण 7/12 या कागदपत्राबद्दल विस्तृतपणे माहिती जाणून घेवूया.
सातबारा उतारा हा जमिनीचा थोडक्यात आराखडा असतो. सातबारा उताऱ्यामध्ये जमीन कोणाची आहे, त्याचा मालक कोण आहे हे सातबारा उताऱ्यामध्ये असते तसेच या जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजून घेण्यासाठीही सातबाराचा उपयोग होतो. ही सर्व माहिती शासकीय अभिलेख महसूल विभागाकडे असते ज्यामध्ये गाव नमुना क्रमांक 7 व गाव नमुना क्रमांक 12 असे दोन विभाग आहेत. गाव नमुना 7 जमिनीच्या मालकी हक्काबाबत आहे व 12 पिकासंबंधित आहे.तसेच सातबारा मध्ये आपल्याला जमिनीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे हे सुद्धा समजते. जमीन महसूल कायदा 1971 अंतर्गत महाराष्ट्र शासन शेतजमिनीच्या विविध मालकी हक्कांबाबत तसेच आराखड्याबाबत नोंद ठेवतात व हे सर्व एका रजिस्टरमध्ये नमूद केलेले असते.