एवढीच परीक्षा पास व्हा आणि पुढे लाईफ सेट आहे

एवढीच परीक्षा पास व्हा आणि पुढे लाईफ सेट आहे !

स्पर्धा परीक्षा आणि तरुण

एवढीच परीक्षा पास व्हा पुढे लाईफ सेट आहे.

लहानपणापासून ते आत्तापर्यंत प्रत्येकाने सांगितलेलं हे वाक्य, पण अजूनही सत्यामध्ये उतरलेल नाही. दहावी मध्ये गेल्यावर कळालं एवढीच परीक्षा पास व्हा पुढे लाईफ सेट आहे परंतु दहावी पास झाल्यावर कळाले की पुढे अजून खूप स्पर्धा आहे. त्यातच सायन्स घेऊ की कॉमर्स घेऊ की अशा एक ना अनेक गोष्टी समोर उभ्या राहतात. त्यातच समाजाचा कल बघता सायन्स मध्ये ऍडमिशन घेतो त्यानंतर असे वाटते अकरावी बारावी मध्ये अभ्यास करा आणि पुढे लाईफ सेट आहे पण परंतु बारावी झाल्यावरती अजून सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो की आता कोणते करिअर निवडावे किंवा कोणत्या क्षेत्रात जावे ?. नुकतेच बारावी पास झालेलो असतो त्यातच फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप व समाजामध्ये असणारे चार लोक सल्ला देतात की तुम्ही एमपीएससी यूपीएससी करा त्यामध्ये करिअर करा आणि तेवढी परीक्षा पास झाली की पुढे लाइफ सेट आहे. प्रत्येक वळणावर येऊन सारखे सारखे एकच वाक्य सांगतात की लाईफ सेट आहे. खरंच एक परीक्षा पास झालो म्हणून आपली लाईफ सेट आहे का ?

 

मग कसेतरी तीन/चार वर्ष ग्रॅज्युएशन करून स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात पहिले पाऊल पडते.ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सरकारी नोकरी करू की खाजी नोकरी करावी हा प्रश्न पडतो. कारण मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलांना सांगणारे/मार्गदर्शन करणारे कोणी नसते. तेव्हा समाजातील, शेजार पाजारचे लोक परत म्हणातात खाजगी नोकरी मध्ये काय आहे सरकारी नोकरी च चांगली चार पैसे जास्त मिळतात कामाची दगदग नसते तुम्ही तुमचे मालक असतात असे एक ना अनेक गोष्टी सांगतात. त्यातच काही जण म्हणातात खाजगी नोकरी करा त्यामध्ये खूप पैसा आहे, या दोन्ही गोष्टी मध्ये एक गोष्ट जी समान आहे. ती म्हणजे एवढी परीक्षा पास व्हा आणि पुढे लाईफ सेट आहे किंवा एखादा जॉब लागला की लाईफ सेट आहे.

 

मग निर्णय घेऊन सरकारी नोकरी साठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पुढे अजून एक प्रश्न उभा राहतो राज्यसेवेचा अभ्यास करायचा की कम्बाईन चा ? कोणत्या परीक्षेसाठी अभ्यास करायचा यामधील निर्णय घेण्याला सहा महिने निघून जातात. एकदा निर्णय झाल्यावर मग पुढे अजून प्रश्न तयार होतात क्लास कोणता लावायचा की नको. प्रत्येक विषयासाठी एक वेगवेगळा क्लास लावावा का स्वतः अभ्यासिका मध्ये बसून अभ्यास करावा असे एक ना अनेक प्रश्न समोर येतात. या धावपळीच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षा करण्यासाठी पुण्यात येतो किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुले असतात तिथे जातो. तिथे गेल्यावरती क्लास मेस अभ्यासिका आणि काही मित्र हेच आपलं काही महिन्यासाठीच आयुष्य. तयारीला लागतो. समाजापासून लांब होऊन एकांतात आपला अभ्यास सुरू होतो. जसे जसे पुढे जाऊ तसे तसे चांगलं अभ्यास पण होती आणि टेन्शनही येते की आपल्याला परीक्षा मध्ये कमी गुण मिळाले तर काय होईल जर आपण पूर्व परीक्षा नापास झालो तर काय होईल. त्यामध्येच समाजामध्ये बातमी पसरलेले असते की अमुक या व्यक्तीच्या मुलगा एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करतोय. जर मी परीक्षेत पास नाही झालो तर काय होईल ? या अशा प्रकारचे विचार मनात डोकावत असतात. आणि जेव्हा हे व्यक्ती कधी गावाकडे गेलो किंवा घरी गेलो की आवर्जून चिडवण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी आपली चेष्टा करत असतात, हा बघा अधिकारी आला असे टोमणे देतात आणि जर परीक्षेत पास झालो तर हेच लोक आपल्या सर्व कुटुंबाचा सत्कार करतात. परंतु ते कधी समोरच्या व्यक्तीचा विचार करत नाही, त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांचे अजूनच मानसिक खच्चीकरण होते. जर समाजातील त्याच व्यक्तींना त्यांच्या मुलांबद्दल किंवा त्यांच्या शिक्षणाबद्दल आपण थोडे काही चांगले सांगितले किंवा थोडे काही विचारले,बोलले तर त्यांना राग येतो. जर त्यांना राग येत असेल तर तेच लोक दुसऱ्याच्या मुलाला का बोलतात, हा विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीने करणे गरजेचे आहे. स्वतःच्या मुलाला हुशार समजणे दुसऱ्याच्या मुलाला ढ समजणे. कधीपर्यंत या गोष्टी चालणार?

 

हे सर्व करत असताना टेन्शन येते घरापासून लांब राहिल्यामुळे बाहेर काही वेळा पैशाची अडचण येते अशा एक ना अनेक संकटांवर मात करून आपण आपल्या जिद्दीने अभ्यास करतो.

 

त्यातच परीक्षा जवळ येते पहिल्या प्रयत्नामध्ये समजते की आपला थोडा अभ्यास कमी पडलेला आहे किंवा अजून आपल्याला खूप अभ्यास करण्याची गरज आहे किंवा काही जण पहिल्या प्रयत्नामध्ये पूर्व परीक्षा पास होतात तसेच मुख्य परीक्षा पास होऊन मुलाखत देऊन अधिकारी होतात. जे अपयशी झाले ते परत पुढच्या वर्षीच्या अभ्यासाला लागतात. पण ज्यांच्या सिलेक्शन पहिल्या प्रयत्नामध्ये झालेले नाही ते दुसरा प्रयत्न करतात अशा मध्येच काही वर्ष निघून जातात एकाचे दोन, दोनाचे तीन, तीन चे चार, चार चे पाच, जसे वर्ष निघून जातात त्यातूनच मानसिक दबाव येतो. जर एक दोन-तीन प्रयत्न मध्ये सक्सेस झालो तर परत एकदा एक शब्द ऐकतो की पुढे लाइफ सेट आहे.

 

आई-वडिलांनी शेतात मोलमजुरी करून आपल्या मुलाला शिक्षणासाठी खर्च केलेला असतो त्यांची खूप इच्छा असते की आपल्या मुलाच चांगलं होवो त्याला एक सरकारी नोकरी लागो परंतु या एवढ्या मोठ्या स्पर्धा परीक्षेच्या युगात प्रत्येकालाच नोकरी भेटेल असं नाही. त्यामुळे आजच्या घडीला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने सोबतच नवनवीन कौशल्य अवगत करणे गरजेचे आहे. परंतु एक गोष्ट नक्की खरी आहे स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी हा खूपच हुशार असतो तसेच तो पुढे आपल्या भारत देशाचा एक आदर्श, सुशिक्षित नागरिक म्हणून समोर येतो. भले त्याचे सिलेक्शन झालेल्या असो वा नसो पण या केलेल्या अभ्यासामुळे तो नक्कीच समाजामध्ये एक आदर्श नागरिक बनतो.

 

जर या परिस्थितीत स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाजूने सक्षमपणे त्याचे आई-वडील उभे असतील त्याचा परिवार उभा असेल तर तो या सर्व गोष्टींचा सामना करू शकतो. पण घरातीलच कोणी व्यक्ती त्याच्या अपयशाबद्दल काही जरी बोलले तरी खूप वेदना होतात त्यामुळे सर्वांना एकच सांगणे आहे की कमीत कमी घरातल्यांनी तरी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणे गरजेचे आहे.

 

कारण लोक कालही बोलत होते आजही बोलत आहे आणि उद्याही बोलणार !

Leave a Comment