PM CARE FUND आणि कोरोना विरुद्ध ची लढाई ..

            मार्च २०२० पासून, जसा कोरोनाने भारतात तळ ठोकला तेव्हापासून देशाची आर्थिक स्थिती नाजूक व्हायला लागली होती. कोविड रुग्णालयांची उभारणी,व्हेंटिलेटरचा पुरवठा, पीपीई किट ची खरेदी यांमुळे वाढत चाललेला देशाचा आर्थिक बोजा सावरण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने PM CARES FUND स्थापण्याची योजना आखली .तर आजच्या या लेखातून आपण या निधी बाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

        PM CARES(पंतप्रधान सहाय्यता आणि आकस्मिक आपत्ती निवारण निधी) ज्याची स्थापना 27 मार्च 2020 रोजी करण्यात आली. पीएम केअर्स निधीचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असून भारताचे संरक्षण मंत्री, गृह मंत्री ,अर्थ मंत्री हे या निधीचे पदसिद्ध विश्वस्त आहेत. या विश्वस्त मंडळावर तीन नामनियुक्त सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार पंतप्रधानांना दिलेला आहे. तसेच विश्वस्त म्हणून नियुक्त व्यक्ती विना मानधन काम करेल हेही नमूद करण्यात आले आहे.
               या निधीमध्ये संपूर्णतः वैयक्तिक/संस्थांनी दिलेल्या ऐच्छिक देणग्यांचा समावेश असेल, त्यासाठी कुठलेही अर्थसंकल्पिय अर्थसहाय्य नसेल. तसेच कोरोना महामारीच्या उपाययोजनांसाठीच याचा वापर करण्यात येईल. पीएम केअरमध्ये देण्यात आलेली रक्कम ही प्राप्तिकर कायदा 1961 मधील 80(G) अंतर्गत मिळणाऱ्या 100 % सवलतीसाठी पात्र असेल. तसेच पीएम केअरला देण्यात आलेली देणगी कंपनी कायदा,2013 मधील कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) चा निधी म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. त्याचप्रमाणे परदेशातील देणग्याना FCRA च्या अंतर्गत सवलती उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
         या निधीचे ‘ऑडिट’ कॅग द्वारा न करता एका स्वतंत्र ऑडिटरद्वारे केले जाईल.23 एप्रिल 2020 च्या बैठकीनुसार ‘M/S SARC And Associates, Charted Accounts, नवी दिल्ली यांच्याकडे पुढील तीन वर्षे ‘पीएम केअर फंड’ चे ऑडिट करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी याचे ऑडिट पार पाडण्यात येईल. तसेच ‘पीएम केअर फंड’ हा पब्लिक ऑथोरीटी नसल्यामुळे RTI (माहितीचा अधिकार) याच्या अंतर्गत येत नाही असे केंद्राकडून नमूद करण्यात आले आहे.
        आर्थिक वर्ष 2019-20 दरम्यान ह्या निधी मध्ये 3076.62 कोटी रुपये जमा झाले. तसेच 39.69 लाख रुपये परदेशी चलनाच्या स्वरूपात निधीला प्राप्त झालेले आहे. त्यापैकी 2000 कोटी रुपये ‘मेड इन इंडिया‘ अंतर्गत 50 हजार भारतीय बनावटीचे व्हेन्टिलेटर्स देशाच्या सरकारी रुग्णालयांत वाटण्यात आले,1000 कोटी रुपये प्रवासी मजुरांच्या व्यवस्थापनासाठी आणि 100 कोटी रुपये लस बनवण्यासाठी देण्यात आलेले आहे.
       आपल्या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला ह्या निधीबाबत माहिती असणे खूप गरजेचे आहे आणि ह्या लेखाद्वारे आपल्यापर्यंत ही माहिती सोप्या पद्धतीने पोहचवण्याचा आमचा हा एक प्रयत्न…
                                             – ऋषिकेश उगले . 
                                              -सौरभ बिनवडे .

Leave a Comment