Tattoo ची शाई का पुसली जात नाही ?

        सध्याच्या फॅशनचे नवनवीन ट्रेंड समोर येत असताना युवकांमध्ये Tattoo शरीरावर कोरण्यासाठी उत्साह वाढलेला दिसून येतो. एका सर्वेनुसार, 18 ते 29 वयोगटातील 38 टक्के युवकांच्या शरीरावर किमान एक Tattoo हमखास दिसतो. तर या tattoo साठी लागणाऱ्या शाईमध्ये कोणते पदार्थ असतात, त्याचा शरीरावर होणारा परिणाम यांबद्दल या लेखाच्या माध्यमातून जाणून घेवूया. 
Tattoo ची कापुसली जात नाही ?

पूर्वीच्या काळी Tattoo का काढले जायचे : 


      इजिप्तजवळील प्रदेशांमध्ये tattoo काढण्याची प्रथा आधीपासून चालत आलेली आहे. प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतीमध्ये शिक्षा म्हणून Tattoo कोरण्याची पद्धत अस्तित्वात होती. तसेच काही प्रदेशांत गुन्हेगार व गुलाम यांची ओळख व्हावी म्हणून त्यांच्या अंगावर tattoo काढले जायचे. 1700 सालानंतर पश्चिमात्य देशांतील खलाशी जेव्हा जगातील विविध प्रदेशांच्या सैर करण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या या कामगिरीची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांनी Tattoo कोरण्यास सुरुवात केली. 

Tattoo कोरण्याची पद्धत : 

       विजेच्या साहाय्याने चालणाऱ्या यंत्राद्वारे ज्यामध्ये सुई लावलेली असते, Tattoo कोरण्याचे काम केले जाते. ही सुई 50 ते 3000 वेळेस / प्रति मिनिट इतक्या वेगाने खाली – वर होण्यास सक्षम असते. आपल्या त्वचेचे तीन थर असतात- 1. Epidermis (बाह्यत्वचा) 2. Dermis (बाह्य त्वचेखालील थर) 3. Hypodermis (सर्वात खालचा थर). आपल्या त्वचेचा सर्वात वरचा थर (बाह्यत्वचा) प्रत्येक तासाला सुमारे हजार पेशी नष्ट करून नवीन पेशी सतत निर्माण करते पण हे कार्य त्वचेच्या dermis थरामध्ये होत नाही त्यामुळे tattoo ची शाई सुईद्वारे dermis थरामध्ये सोडली जाते. 

Tattoo च्या शाईमध्ये काय असते : 

     Tattoo च्या शाईमध्ये दोन प्रकारचे घटक असतात – रंग वाहक व रंगद्रव्य. रंग वाहक जे dermis पर्यंत रंगद्रव्य पोहोचवण्यासाठी वापरले जातात त्यामध्ये ग्लिसरीन, पाणी, आयसोप्रोपाईल अल्कोहोल यांचा वापर केला जातो तर रंगद्रव्यात कार्बन, आयरन ऑक्साईड, कॅडमियम व टायटॅनियम ऑक्साईड सारख्या पदार्थांचा वापर केला जातो ज्याद्वारे tattoo ला विविध रंगांमध्ये कोरले जाते. काही संशोधनानुसार, लाल हा सर्वात घातक रंगद्रव्य आहे व त्यानंतर निळा, काळा यांसारख्या रंगद्रव्यद्वारे कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सध्या UV Tattoo ची सुद्धा मागणी वाढत चालली आहे जे UV किरणांना परावर्तित करून स्पष्ट दिसतात. 
तसेच पूर्वीच्या काळी काही जमातींमध्ये जळलेल्या लाकडाच्या काजळीद्वारे tattoo कोरण्याची पद्धत वापरली जात असे.
      
Tattoo शाईवरील सरकारचे नियंत्रण : 

      ग्राहकांमध्ये जागरूकतेेचा अभाव असल्याकारणाने शाईची गुणवत्ता, बनवण्याचे स्त्रोत याबद्दल जास्त विचारणा केली जात नाही. तसेच शाई बाटलीवर त्याचे बनवण्याचे साहित्य प्रदर्शित करण्याचीही सक्ती नसल्यामुळे बऱ्याचदा या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. शाईच्या रंगामध्ये बऱ्याचदा प्लास्टिक, कापड, वाहन उद्योगातील रंगद्रव्य वापरले जातात व त्याची माहिती ग्राहकांना नसते. यामध्ये बऱ्याचदा polycyclic aromatic hydrocarbons हे पदार्थ वापरले जातात ज्यांना मानवी शरीरास हानिकारक, कर्करोगजन्य पदार्थ म्हणून घोषित केले गेले आहे. याच मुद्द्यावर लक्ष ठेवून युरोपियन देश कठोर कायद्यांचा अवलंब करीत आहेत ज्याआधारे शरीरासाठी हानिकारक सौंदर्यप्रसाधने या शाईत वापरण्यास बंदी घातली आहे. 

Tattoo कोरतांना त्रास का जाणवतो : 

     Dermis या त्वचेच्या थरामध्ये रक्त वाहिन्या, घाम ग्रंथी, मज्जातंतू असतात ज्यामुळे आपल्याला tattoo कोरतांना त्रास जाणवतो. शरीरावर tattoo कोरतांना जेव्हा शाई शरीरात शिरकाव करते त्यावेळेस आपली रोगप्रतिकारक शक्ती जागी होते व शाईजवळ येवून तिला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते पण शाईच्या जेलमध्ये अडकून तेथेच स्तब्ध राहून जाते. 
      
Tattoo काढण्याची पद्धत : 

      Tattoo शरीरावरून काढण्यासाठी लेझरचा वापर करण्यात येतो. काळा व गडद रंग असलेले tattoo लवकर काढले जातात कारण लेझरद्वारे पाठवलेल्या किरणांना गडद रंग शोषून घेतात याउलट पांढरा रंग हेच किरणे परावर्तित करतात ज्यामुळे त्यांना काढण्यासाठी जास्त मेहनत लागते. शाईचे कण लेझर किरणे शोषून घेतात व लहान कणांमध्ये विखुरले जातात. त्यानंतर ते लसिका संस्थाद्वारे (lymphatic system)  शरीराबाहेर सोडले जातात. Tattoo जेवढा हृदयाजवळील भागात असेल तेवढा लवकर काढला जातो कारण रक्ताचा पुरवठा जास्त असल्यास विखुरलेले शाईचे कण शरीराबाहेर काढण्यास मदत होते.

Read More : भारतामधे सोन्याच्या खाणी कोठे आढळतात ?

Read More : ‘चेक बाऊन्स’ झाल्यावर होणार कारावासाची शिक्षा !!!

Leave a Comment